पुणे - कोरोनाच्या नियमांचा भंग करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात गर्दी जमवल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई शिवाजीनगर पोलिसांनी केली.
100 ते 150 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल -
पुण्यातील शिवाजीनगर परिसरात शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचा उद्घाटन समारंभ पार पडला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या नवीन कार्यालयाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, जमलेल्या गर्दीवर पोलीस काय कारवाई करणार? याची चर्चा सोशल मीडियात सुरू झाली. यादरम्यान, कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह 100 ते 150 कार्यकर्त्यांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष महेश रमेश हांडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक निलेश निकम, बाळासाहेब बोडके, सरचिटणीस रोहन पायगुडे यांच्यासह 100 ते 150 अनोळखी महिला आणि पुरुष यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार दिनेश वीर यांनी फिर्याद दिली आहे. भादवी कलम 188, 269, 270 राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ब, महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना 2020 चे कलम 11 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - 'मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की',अमेय खोपकर यांनी केलं ट्विट
शासन नियमावलीचे उल्लंघन -
शनिवारी सायंकाळी शिवाजीनगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लग्नासाठी 50, अंत्यसंस्कारासाठी 20, सार्वजनिक कार्यक्रमासाठी शासन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने परवानगी असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यक्रमात मात्र मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यक्रमात 400 ते 500 कार्यकर्ते सहभागी झाले होते. यातील अनेकांनी मास्क घातले नव्हते. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने कोरोना नियमांचे उल्लंघन होऊनही कारवाई का नाही? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात होता.