जळगाव - शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये मंगळवारी दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला. याठिकाणी दाखल केलेल्या दोन पॉझिटिव्ह रुग्णांनी देशी दारू पिऊन चांगलाच गोंधळ घातला. मद्यधुंद अवस्थेत दोघे महिला कक्षातही घुसले होते. त्यांना आवरण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरक्षारक्षकांशी देखील त्यांनी अरेरावी केली. कोविड केअर सेंटरमधील यंत्रणेला त्यांनी चांगलेच जेरीस आणले होते. या प्रकाराची माहिती मिळताच महापौर भारती सोनवणे व नगरसेवक कैलास सोनवणे यांनी त्याठिकाणी धाव घेत दोन्ही रुग्णांची खरडपट्टी काढली. दोघांची रवानगी जिल्हा रुग्णालयात करण्यात आली असून, या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालयातील वसतिगृहात कोविड केअर व क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहे. पिंप्राळा उपनगरातील दोन रिक्षाचालकांचा पॉझिटिव्ह अहवाल आल्याने, या ठिकाणी ते कुटुंबीयांसह सोमवारी दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी रात्री दारू पिऊन गोंधळ घातला होता. मंगळवारी सकाळी पुन्हा त्यांनी सेंटरमधून बाहेर जाण्यासाठी सुरक्षारक्षकांशी वाद घातला. सुरक्षारक्षक त्यांना अडवत असताना ते पॉझिटिव्ह असल्याने अंगाला हात लावण्याची धमकी देत बाहेर पडले. या प्रकाराची माहिती सुरक्षारक्षकांनी डॉक्टरांना दिली. त्यानंतर दोघेही रिक्षाने कोविड सेंटरमध्ये परतले. दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांनी आपल्या सोबत देशी दारूच्या बाटल्या आणल्या होत्या. दोघे त्यांच्या कक्षात न जाता महिलांच्या कक्षांमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे कोविड सेंटरमधील यंत्रणेची धांदल उडाली. दोन्ही कोरोनाबाधित असल्याने सुरक्षारक्षक त्यांना हात लावण्यास घाबरत होते.
बॅगेतही आढळल्या दारूच्या बाटल्या -
दोन्ही रुग्णांच्या बॅगेची झडती केली असता दारूच्या दोन बाटल्या आढळून आल्या. महापौरांनी त्यांच्या बाहेर लावलेल्या रिक्षात तपासणी करायला लावली असता, त्यात आणखी दोन दारूच्या बाटल्या मिळून आल्या. महापौरांनी याबाबत त्याठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला या प्रकारचे चित्रीकरण करायला सांगितले. दोघांची तातडीने जिल्हा रुग्णालयात रवानगी करण्यात आली असून, याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
हेही वाचा - कुत्र्याने तोडला प्रौढाच्या चेहऱ्याचा लचका... उपचारासाठी रुग्णाची चार तास फरफट
हेही वाचा - 'लॉकडाऊन'नंतर पहिल्याच दिवशी कोलमडले 'नो व्हेईकल झोन'चे नियोजन