जळगाव - गेल्या १५ वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने महाराष्ट्र सडवल्याची घणाघाती टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली. आदित्य ठाकरेंच्या जन-आशीर्वाद यात्रेला जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथून सुरू झाली. त्यांनतर त्यांची तिसरी जाहीर सभा गुरुवारी सायंकाळी धरणगाव येथे पार पडली. यावेळी उपस्थितांना संबंधित करताना ते बोलत होते.
आदित्य पुढे म्हणाले की, 'सुजलाम सुफलाम' असा महाराष्ट्र मला घडवायचा आहे. शिवसेनेचे खासदार, आमदार तसेच कार्यकर्ते चांगले काम करत आहेत. मात्र, महाराष्ट्र अजून समृद्ध करायचा असेल तर आपल्याला कामाचा वेग वाढवावा लागणार आहे. नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जसा 15 वर्षे महाराष्ट्र सडवला तसा तो सडतच राहील. महाराष्ट्र जसा आहे, तसा थांबलेला पाहिजे का वेगाने पुढे जाणारा महाराष्ट्र पाहिजे, असे आवाहनही युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज शिवसेना कार्यकर्त्यांसह जनतेला केले.
ते पुढे म्हणाले, '80 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारण' हे शिवसेनेचे ब्रीदवाक्य आहे. या ब्रीदनुसार शिवसैनिक नि:स्वार्थ भावनेने काम करतात. तुम्हाला जेव्हा काम पडले, तेव्हा तुम्ही शिवसैनिकाला हाक मारल्यावर तो तात्काळ तुमच्या मदतीला येतो आणि जेव्हा आम्ही तुम्हाला हाक मारली तेव्हा तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहात. तुमचे आभार मानायला मी आलो आहे. यावर्षी राज्यात ऑक्टोबरपासून दुष्काळ होता. त्यामुळे पाणी, चारा छावण्या अशा प्रकारची मदत आम्ही शेतकऱ्यांना केली. अजूनही राज्यात गावोगावी मदतकेंद्र सुरू होत आहेत. पिकविम्याची मदत गरजूंना मिळावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. तसेच आम्ही शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ, सरसकट कर्जमाफी मिळवून देणारच, असा ठाम विश्वासही आदित्य ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.
मुख्यमंत्री कोण होणार, घडणार यासाठी मी आलेलो नाही -
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मुख्यमंत्री फडणवीस सांगत आहेत की, आपण युतीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहोत. पण मुख्यमंत्री कोण होणार, घडणार यासाठी मी तुमच्यापर्यंत आलेलो नाही. मुख्यमंत्री कोण होणार, यात मला रस नाही. मला समृद्ध महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे, असे आवाहन देखील ठाकरेंनी यावेळी जनतेला केले.