जळगाव -कोरोनासारख्या महामारीच्या काळातही जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे हे आपल्या कर्तव्यात कसूर करत आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना त्यांना कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नाहीये, असा आरोप करत मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी डॉ. खैरे यांची थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे. भुसावळ येथील कोरोनाग्रस्त रुग्णांबाबत चुकीची भूमिका घेतल्यामुळे संपूर्ण शहर दहशतीखाली आल्याचे आ. पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सद्यस्थितीत जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घातलेले असून मुंबईसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वाढत्या रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. मात्र, अशा गंभीर परिस्थितीत जळगाव जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांचा भोंगळ कारभार सुरू आहे. 30 एप्रिल रोजी जिल्ह्यातील एकूण 52 संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यात भुसावळ येथील काही रुग्णांना तपासणीचा अहवाल येण्याआधीच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याच दिवशी रात्रीच्या सुमारास सदरील दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण भुसावळ शहरात कोरोनाच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकाराला डॉ. खैरे कारणीभूत असल्याने त्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आ. चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. जिल्हा रुग्णालय हे कोरोनासाठी राखीव असून याठिकाणी 200 खाटांची व्यवस्था आहे. भुसावळच्या संशयितांचे अहवाल येण्यापूर्वी त्यांना डिस्चार्ज दिला तेव्हा जिल्हा रुग्णालयात फक्त 105 रुग्ण भरती होते. त्यामुळे सदरील रुग्णांना सुद्धा याठिकाणी भरती करता आले असते. मात्र, तशी कार्यवाही झाली नाही, असेही तक्रारीत नमूद केले आहे.
दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार पाटील यांच्या तक्रारीची दखल घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले आहे. डॉ. भास्कर खैरे दोषी आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाईसाठी आग्रही भूमिका घेऊ, असेही गुलाबराव पाटील यांनी या विषयावर प्रतिक्रिया देताना सांगितले.