जळगाव - समोरासमोर दोन दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला होता. ही घटना दीडवर्षांपूर्वी घडली होती. नुकसान भरपाई मिळावी यासाठी खटला न्यायाप्रविष्ठ होता. जिल्हा विधी प्राधिकणाच्या माध्यमातून मोटार अपघात मध्यस्थीद्वारे ३२ लाखाची तडजोड करण्यात आली.
दिलीप आत्माराम चौधरी (रा. भुसावळ) हे ९ डिसेंबर २०१८ रोजी फैजपूर ते भुसावळ रोडवरील बामणोद गावाजवळ दुचाकीने जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली होती. या अपघातात चौधरी यांचा मृत्यू झाला होता. चौधरी हे भाजीविक्रेते होते. त्यांच्या वारसदारांनी नुकसान भरपाई मिळावी यासाठी जळगाव जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता. गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या खटल्याचे काम न्यायाधिश डॉ. एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात प्रलंबित होते. दरम्यान, २६ मे २०२० रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे मध्यस्थी करीता पाठविण्यात आले होते. यावेळी जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधिश एस.डी.जगमलानी यांनी मध्यस्थी कडून नुकसान भरपाई पोटी ३२ लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहे. आयसीआयसीआय विमा कंपनीतर्फे ॲड.अनिल चौघुले यांनी तर चौधरी यांच्यातर्फे ॲड. एम.एस.चौधरी यांनी कामाकाज पाहिले. तडजोडीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के.एच.ठोंबरे यांनी सहकार्य केले.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाचे कामकाज अद्यापपर्यंत पुर्णपणे सुरू झालेले नाही. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तडजोड पात्र प्रकरणे, दावे खटल्यांमध्ये तडजोडी करण्याच्या प्रयत्नाकरीता मुभा देण्यात आली आहे. याच अनुषंगाने वरील तडजोडी पात्र खटला न्यायालयात सादर केला होता.