जळगाव - कोरोनामुळे आपल्या आरोग्य सेवेची क्षमता लक्षात आली आहे. आरोग्य सेवा खूपच तोकडी होती. कोरोनामुळे आरोग्य सेवेतील कच्चे दुवे समजले. येत्या काळात आरोग्य क्षेत्रात मोठे आव्हान असणार आहे. आरोग्य सेवा सक्षम नसेल तर खूप आव्हान असेल. आतापर्यंत 40 हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यापूर्वी कधीही एखाद्या महामारीत एवढ्या लोकांचा मृत्यू झाला नव्हता. यापुढे आपल्याला स्वतःला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. कोरोनामुळे मोठेमोठे पहिलवान घरी बसले. अनेक जण आपल्यातून निघून गेले. त्यामुळे मनाने जवळ या, शरीराने दूर रहा. प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळा, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे भाजपचे माजीमंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा आज (दि. 13 ऑक्टोबर) दुपारी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार सुभाष भामरे, रक्षा खडसे, उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, संजय सावकारे, चंदूलाल पटेल, सुरेश भोळे, किशोर पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, जळगावच्या महापौर भारती सोनवणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, संघटनमंत्री किशोर काळकर, जामनेर नगराध्यक्षा साधना महाजन आदींची उपस्थिती होती.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, गिरीश महाजन यांचे अभिनंदन करतो. आज जगभरात ज्या आधुनिक सुविधा आरोग्य क्षेत्रात उपलब्ध आहेत. त्यातील काही महत्वाच्या सुविधा गिरीश महाजन यांनी जामनेरसारख्या तालुक्याच्या ठिकाणी आणल्या. या रुग्णालयामुळे गोरगरिबांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत. गिरीश महाजन यांनी आमदार म्हणून चांगली कामे केली आहेत. गेल्या सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणून उत्तम कामे केली. त्यांनी आरोग्यदूत म्हणून सर्वोत्तम काम केले आहे. गिरीश महाजन यांनी अनेक दानशूर लोकांची मदत घेऊन गोरगरिबांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. येथील रुग्णसेवेचे दर हे अत्यंत माफक आहेत. अनेक सरकारी योजनांचा लाभ लोकांना मिळणार आहे. खऱ्या अर्थाने लोकांना अनेक ट्रस्टच्या मदतीने आरोग्य सेवा मिळणार आहेत. ज्याच्याकडे पैसे नाहीत, अशा व्यक्तीला देखील उपचार मिळणार आहेत. याठिकाणी टेलिमेडिसीन सुविधा उपलब्ध आहे. रिलायन्सने अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा उपलब्ध करून दिल्याने मुंबईतून डॉक्टरांची सेवा मिळू शकणार आहे. मुंबई, पुण्यासारख्या महानगरात जी आरोग्य सेवा मिळणार नाही, ती आता याठिकाणी मिळणार आहे. कोरोनासारख्या काळात हे हॉस्पिटल उपयुक्त ठरणार आहे, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला.
जनतेच्या प्रेमातून उतराई होण्याचा माझा प्रयत्न- गिरीश महाजन
कार्यक्रमात गिरीश महाजन म्हणाले, जामनेरसारख्या तालुक्याच्या ठिकाणी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे आज लोकार्पण झाले, याचा आनंद आहे. याठिकाणी सर्व प्रकारचे उपचार होणार आहेत. गोरगरिबांना आता मुंबई, पुणे अशा महानगरात जाण्याची गरज राहणार नाही. या रुग्णालयासाठी अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहेत. हे रुग्णालय उभारण्यासाठी आपण सरकारकडून एक रुपयाही घेतला नाही. कोरोनाच्या काळातही आपण लोकांची सेवा केली. 30 वर्षे मला मतदारसंघातील जनतेने जे प्रेम मला दिले, त्यातून उत्तराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. याठिकाणी आता मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या माध्यमातून एमआरआय, सिटी स्कॅनच्या सुविधा मिळतील. येथील शस्त्रक्रियागृह अतिशय उपयुक्त आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुविधा असलेली उपकरणे आहेत. या रुग्णालयासाठी मी अंबानींना स्वतः विनंती केली होती. त्यांनीही 2 ते 3 कोटी रुपयांची मदत करत साधनसामग्री उपलब्ध करून दिली. उच्चशिक्षित डॉक्टरांकडून उपचाराची सुविधा आपल्याला मिळणार आहे. अनेक संस्थांनी देखील सढळ हाताने मदत केली. कॅन्सरसारख्या आजारांवर याठिकाणी उपचार होतील. डायलिसिस देखील येथे होईल. एखादा रुग्ण या रुग्णालयामध्ये उपचारासाठी आला की त्याला बाहेर जाण्याची गरज नाही. येथील कर्मचारी देखील प्रशिक्षित आहेत. 200 कामगार आहेत, ते रुग्णसेवा करतील. बीव्हीजी कंपनी रुग्णालयाला मनुष्यबळ पुरवत आहे. रिलायन्स, टाटा सारख्या मोठ्या समूहांनी आपल्याला मदत केली. हे रुग्णालय उभे राहिल्यानंतर काहींना पोटशूळ उठला आहे. काही जण माहितीच्या अधिकारात माहिती मागवत आहेत. पण, चांगले काम केले आहे, कशाचीही भीती नाही. चांगले रुग्णालय उभे राहिले आहे, राहू द्या ना. ज्याला जी आवश्यक सेवा हवी आहे, ती या रुग्णालयामध्ये उपलब्ध होणार आहे. हे रुग्णालय आपले आहे, या ठिकाणी अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.
कार्यक्रमस्थळी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
या कार्यक्रमाच्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला होता. कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारी म्हणून कुठेही नियमांचे पालन करण्यात आले नाही. बहुसंख्य लोकांनी तोंडाला मास्कही लावलेला नव्हता. हँड सॅनिटायझेशनची व्यवस्था नव्हती. त्यामुळे रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा आणि आरोग्याशी निगडित नियमांचे पालन झाल्याचे दिसून आले नाही.
हेही वाचा - मंदिरे उघडण्याच्या मागण्यासाठी जळगावात भाजपचे आंदोलन