जळगाव - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रचाराला आता खऱ्या अर्थाने जोर चढला आहे. प्रचारानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार उन्मेष पाटील आणि रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ येत आहेत. यावेळी अमळनेर, रावेर आणि जळगाव अशा तीन ठिकाणी त्यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
फडणवीस यांची पहिली सभा दुपारी १२ वाजता अमळनेरात होणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसेंच्या प्रचारासाठी रावेरात तर तिसरी सभा जळगाव लोकसभेचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्यासाठी जळगावात होणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजीमंत्री एकनाथ खडसे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील अशी नेतेमंडळी उपस्थित राहणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खान्देशवासीयांना काय आश्वासने देतात आणि जळगाव जिल्हा भाजपमधील गटबाजी मिटवण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांना काय डोस देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अमळनेरात मागील आठवड्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत युतीच्या मेळाव्यात भाजपच्या जिल्हाध्यक्षाने माजी आमदाराला मारहाण केली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असेल.
पाडळसे धरण जनआंदोलन समितीच्या भूमिकेकडेही लक्ष -
अमळनेर तालुक्यातील पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्प पुरेशा निधीअभावी रखडला असल्याने पाडळसे धरण जनआंदोलन समितीचे पदाधिकारी आज मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या ठिकाणी आंदोलन करण्याची शक्यता आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने आमचा मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर मांडू, अशी भूमिका समितीच्यावतीने मांडण्यात आली आहे. यासोबतच कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, म्हणून सभेच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.