जळगाव - शहरातील ख्रिस्ती बांधवांतर्फे नाताळाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. नाताळ सणानिमित्त शहरातील तीन्ही चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जगात शांतता नांदावी, परस्परातील प्रेमभाव वृद्धिंगत व्हावा यासाठी ख्रिस्ती बांधवांतर्फे प्रार्थना करण्यात आली. नाताळासह नववर्षाच्या शुभेच्छांच्या वर्षावात प्रभू येशूचा जन्मोत्सव साजरा झाला.
मंगळवारी मध्यरात्रीपासूनच नाताळाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. जळगाव शहरात मेहरूण तलावाजवळ सेंट थॉमस चर्च, रामानंदनगर रस्त्यावर सेंट फ्रान्सिस डी सेल्स चर्च आणि पांडे डेअरी चौकातील सेंट अलायन्स चर्च असे तीन चर्च आहेत. तिन्ही चर्चमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट करण्यात आली आहे. येशूच्या जन्मत्सोवाचे देखावे साकारण्यात आले आहेत.
हेही वाचा - नागपुरात नाताळचा उत्साह शिगेला; ख्रिस्ती बांधवांनी दिल्या शुभेच्छा
बुधवारी सकाळपासून ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. प्रत्येक जण एकमेकांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या. लहानमुलांनीदेखील एकमेकांना शुभेच्छा देऊन भेटवस्तूंचे आदान-प्रदान केले.
'ग्लोरिया नाईट' रंगली
नाताळानिमित्त प्रत्येक चर्चमध्ये ख्रिसमस गीतांची रंगत होती. 'ग्लोरिया नाईट' हा रंगतदार कार्यक्रम मंगळवारी मध्यरात्रीनंतर रंगला. यात येशूच्या जीवनावरील गीते सादर करण्यात आली. सर्व चर्चमध्ये येशूच्या जन्माचा देखावा उभारण्यात आला आहे. हा देखावा पाहण्यासाठी ख्रिस्ती बांधवांसह इतर समाजबांधव देखील चर्चमध्ये हजेरी लावत आहेत.