जळगाव - शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी उत्तर भारतीयांचा छटपूजेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छटपूजेच्या माध्यमातून उत्तरभारतीय भाविकांनी सुख-शांतीसह कोरोनामुक्ती तसेच सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी सूर्यदेवतेला अर्घ्य देत मनोभावे साकडे घातले.
उत्तर भारतीयांच्या छटपूजेत शहर व परिसरातील भाविकांनी मेहरूण तलावाच्या काठावर विधीवत पूजा करून सूर्याला अर्घ्य दिले. शुक्रवारी सायंकाळी मावळत्या सूर्याला अर्घ्य देत पूजेला सुरुवात झाली. त्यानंतर आज शनिवारी सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन ही पूजा पूर्ण झाली. मेहरूण तलावाकाठी गणेश घाट येथे छटपूजेचे आयोजन करण्यात आले होते.
साध्या पद्धतीने साजरी झाली पूजा -
यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे छटपूजा साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. उत्तर भारतीय संघ छटपूजा समितीचे अध्यक्ष ललन यादव, उपाध्यक्ष मनोहर सहानी, कार्याध्यक्ष चंदन सहानी, अमित यादव, प्रकाश सिंह, एस. एन. यादव, राबहादूर गुप्ता, रणवीर सिंह, यशवंत मिश्रा, राजेश विश्वकर्मा, गौरी कुशवाह, राम मौर्य, राजेश साहनी उपस्थित होते.
भजन व कीर्तन रद्द -
यावर्षी छटपूजेवर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शनिवारी सकाळी शहराजवळ असलेल्या मेहरूण तलावाकाठी उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन पूजा करण्यात आली. छटपूजेच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी मावळत्या सूर्याला अर्घ्य देऊन आयोजित करण्यात येणारे भजन व कीर्तनाचे कार्यक्रम यावर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आले होते.
हेही वाचा - देशभरात उत्साहात पार पडले छठ महापर्व