जळगाव - लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळणार आहे. कोऱ्या कागदावर लिहून घ्या किंवा कोणाशीही पैज लावायला हरकत नाही, केंद्रात भाजपच्या २९० तर राज्यात भाजप आणि शिवसेना युतीच्या ४४ जागा येतील, असा विश्वास राज्याचे महसूल तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
चंद्रकांत पाटील हे आज जळगाव जिल्ह्यातील दुष्काळाच्या पाहणीसाठी जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. यावेळी चाळीसगाव येथे शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात भाकीत वर्तवले.
पाटील म्हणाले, केंद्रात भाजपला २९० जागा हमखास मिळणार आहेत. त्याचप्रणाणे राज्यात भाजप आणि सेनेची युती असल्याने युतीला ४४ जागा मिळतील. पश्चिम महाराष्ट्रातील १० पैकी सर्व म्हणजे १० जागा युती पटकवणार आहे. त्यामध्ये पुणे, बारामती, मावळ, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या महत्वाच्या जागांचा समावेश असेल, असेही त्यांनी सांगितले.
राज ठाकरे रेड पेन्सिल घेऊन बसलेत-
राज ठाकरे सातत्याने सरकारवर टीका करत आहेत, यासंदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता चंद्रकांत पाटील म्हणाले, राज ठाकरे आमचे चांगले मित्र आहेत. त्यांच्याविषयी कडवट टीका करणे योग्य नाही. राज ठाकरे हे रेड पेन्सिल घेऊन बसले आहेत. रेड पेन्सिलचे काम असे असते की पानावरील १० चांगल्या गोष्टी दुर्लक्षित करून एकाच चुकीच्या गोष्टीवर मार्क करायचा असतो. ठाकरे तेच करत आहेत. पण आमच्या १० गोष्टी चांगल्या आहेत. त्याकडे दुर्लक्ष व्हायला नको. सरकार योग्य प्रकारे चालावे म्हणून अशी रेड पेन्सिल घेऊन एखाद्याने बसणे गरजेचे आहे, असा चिमटा पाटील यांनी घेतला.