जळगाव - संसदेने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांच्या विरोधासाठी बांभोरीनजीकच्या गिरणा नदीच्या पुलाजवळ शुक्रवारी (दि. 25 सप्टें.) रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनकर्त्यांनी कोरोनाबाबतच्या सर्व नियमांची पायमल्ली केली. यामुळे 44 जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी केंद्र सरकारविरोधात व अन्यायकारक कामगार कायदे हाणून पडण्यासाठी विरोधी सर्वपक्षीय संघटनेकडून लोकसंघर्ष मोर्चाचे अध्यक्ष प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बांभोरी पुलाजवळ शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात आंदोलनकर्त्यांकडून तोंडावर मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, गर्दी करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, जमावबंदीचे आदेश असताना त्याची अंमलबजावणी न करणे तसेच बेकायदेशीरपणे महामार्गावर जमाव जमवून दोन्ही बाजूची वाहने अडवून ठेवणे, निष्काळजीपणाने मानवी जीवितास व व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात घालून साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होईल असे कृत्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसंघर्ष मोर्चाचे प्रतिभा शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, अल्पसंख्याक आघाडी प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलीक अब्दुल रज्जाक, राष्ट्रवादीचे प्रवक्ते योगेश देसले, माजी उपमहापौर अब्दुल करीम सलार, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांसह अनेक अंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - भाजपाच्या नव्या केंद्रीय कार्यकारिणीत खडसेंना डच्चू; पंकजा मुंडेंसह विनोद तावडेंचे पुनर्वसन