जळगाव - 'समाजाचे आपण काही देणे लागतो', या उदात्त भावनेतून जळगावातील जय मल्हार प्रतिष्ठानने गरजू रुग्णांसाठी कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. आज सायंकाळी आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण पार पडले. या रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळून त्यांचा जीव वाचवण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा - दिलासादायक.. जळगाव जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांच्या आत, रिकव्हरी रेटही वाढून 92.18 टक्क्यांवर
जळगाव शहरातील जय मल्हार प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या 15 वर्षांपासून रुग्णांसाठी रुग्णवाहिका सेवा दिली जात आहे. सध्या कोरोना महामारीचा कठीण काळ सुरू आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. अशा परिस्थितीत रुग्णांसाठी रुग्णवाहिकेची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक असल्याने रुग्णांना दवाखान्यात दाखल करण्यासाठी कार्डियाक रुग्णवाहिका गरजेची असते. हीच बाब लक्षात घेऊन जय मल्हार प्रतिष्ठानने अत्याधुनिक यंत्रणेसह सुसज्ज वैद्यकीय यंत्रसामग्री असलेली कार्डियाक रुग्णवाहिका स्वखर्चाने उपलब्ध करून दिली आहे. आज तिचे लोकार्पण होऊन ती रुग्णांच्या सेवेत हजर झाली.
रुग्णांचा जीव वाचवणे, हेच उद्दिष्ट
जय मल्हार प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत येवस्कर म्हणाले की, जय मल्हार प्रतिष्ठान गेल्या 15 वर्षांपासून रुग्णसेवेसाठी रुग्णवाहिका सेवा देत आहे. रुग्णांचा जीव वाचावा, हेच आमच्या प्रतिष्ठानचे उद्दिष्ट आहे. कोरोना काळात कार्डियाक रुग्णवाहिकेची गरज लक्षात घेऊन आम्ही ही रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे, गंभीर रुग्णांना आता मुंबई, पुणे यासारख्या महानगरांमधील रुग्णालयांमध्ये हलवणे सोयीचे होणार आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, जय मल्हार प्रतिष्ठानने जोपासलेली सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद आहे. समाजसेवेसाठी त्यांनी घेतलेला वसा यापुढेही कायम ठेवावा, अशी अपेक्षा आमदार सुरेश भोळे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - वहिनीचा खून करणाऱ्या दिराची पोलीस कोठडीत रवानगी; घटनेमागे प्रॉपर्टीचा वाद असल्याचा आरोप