जळगाव - किड्स गुरुकुल स्कूलच्या प्राचार्या मीनल जैन यांच्या दौलत नगरातील घरात सोमवारी रात्री चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातून सात लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून साडेपाच लाख रुपये किमतीचे १३ तोळे सोन्याचे दागिने, दीड लाख रुपये रोख व काही शोभेचे दागिने असा एकूण सात लाख रुपयांचा ऐवज लांबवला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील मोहाडी रोड परिसरात असलेल्या दौलत नगरातील मुख्य रस्त्यावरच प्लॉट क्रमांक २६ मध्ये मीनल जैन या वास्तव्याला आहेत. गेल्या महिनाभरापासून त्या आई प्रेमलता, वडील संतोष जैन, भाऊ नितीन जैन व वहिनी कृती जैन यांच्यासह किडस् गुरुकूल स्कूलमध्येच वास्तव्याला आहेत. अधूनमधून त्यांचे दौलत नगरातील घरी येणे-जाणे होते. तीन दिवसांपूर्वीच घरी येऊन त्या परत शाळेत गेल्या होत्या.
मंगळवारी सकाळी शेजारी राहणारे गजानन मराठे यांनी मोबाईलवर संपर्क करून घराचे कुलूप व कडी कोंयडा तुटल्याची माहिती जैन यांना दिली. त्यानुसार त्यांनी सकाळी घरी येऊन पाहिले असता घरात चोरट्यांनी चोरी केल्याचे दिसून आले. मीनल जैन घरी आल्या तेव्हा मुख्य दरवाजा आतून बंद होता. किचनकडील मागील दरवाजा मात्र, उघडा होता. तेथून प्रवेश केला असता घरातील प्रत्येक खोलीतील साहित्य अस्ताव्यस्त केलेले होते. कपाट, बेडमधील साहित्य काढलेले होते. कपाटात व बेडमध्ये ठेवलेले दागिने, रोेख रक्कम, नकली दागिने, शाळेची महत्त्वाची कागदपत्रे, मालमत्तेची कागदपत्रे त्याशिवाय बक्षीस म्हणून मिळालेल्या महागड्या वस्तूदेखील चोरट्यांनी लांबविल्याचे दिसून आले.
पोलिसांनी श्वान पथकाला केले पाचारण -
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल बडगुजर, सहायक फौजदार गोपाळ चौधरी, हवालदार अनिल फेगडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे विजयसिंग पाटील, राजेश मेढे, संजय हिवरकर, विजय काळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र, चोरटे वाहनाने पसार झाल्याने श्वान पथकाकडून ठोस धागेदोरे मिळू शकले नाहीत. या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये काही धागेदोरे मिळतात का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.