जळगाव - जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे असलेल्या आयुध निर्माणी कारखान्यात आज (शुक्रवार) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अचानक स्फोट झाला. या स्फोटात या एका अधिकाऱ्यासह दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी कर्मचाऱ्यांना उपचारासाठी जळगावला हलविण्यात आले आहे.
हेही वाचा - ज्येष्ठ पत्रकार, संपादक नीळकंठ खाडिलकर यांचे निधन
वरणगाव आयुध निर्माणी कारखान्यातील सेक्टर तीनमधील ट्रेसर विभागात असलेल्या बिल्डिंग नंबर 44 मध्ये हा स्फोट झाला आहे. या स्फोटात कनिष्ठ कार्य प्रबंधक नितीन पाटील यांच्यासह डी. बी. वर्कर गणेश धांडे आणि सचिन सपकाळे जखमी झाले. तिघेही लोडिंग ट्रेसर विभागात नायट्रेट कंपोझिशन नामक ज्वलनशील पदार्थ हाताळत होते. या ज्वलनशील पदार्थापासून बंदुकीच्या गोळीची दारू बनवली जाते. मात्र, त्या पदार्थाचा स्फोट का झाला? याचे कारण समजू शकलेले नाही.
हेही वाचा - केईएम रुग्णालयाच्या निष्काळजीने प्रिन्सचा अखेर मृत्यू, आधी गमावला होता हात
स्फोटानंतर विभागात आग लागल्याने काही सामुग्री देखील जळून खाक झाली. या दुर्घटनेत नितीन पाटील हे 20 ते 25 टक्के तसेच सचिन सपकाळे आणि गणेश धांडे हे दोघे 40 ते 45 टक्के भाजले आहेत. तिघांचे चेहरे, छाती तसेच पोटाचा काही भाग भाजला आहे. स्फोट झाल्यानंतर तिघांपैकी एक कर्मचारी जळताना इमारतीच्या बाहेर आला. त्याचा आरडाओरडा ऐकून बाजूच्या इमारतीतील कर्मचाऱ्यांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तात्काळ रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या गाड्यांनी पाचारण करण्यात आले. जखमी कर्मचाऱ्यांना आयुध निर्माणीच्या रुग्णालयात दाखल करून तेथे प्रथमोपचार करण्यात आले. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांना जळगाव येथील बर्न हॉस्पिटलला हलविण्यात आले.
हेही वाचा - उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये रात्री उशिरा बैठक, आज मोठ्या घोषणेची शक्यता
दरम्यान, या घटनेची माहिती आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांना मिळतात युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव येथील रुग्णालय गाठत कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. संबंधित कर्मचाऱ्यांना एअर रुग्णवाहिकेने मुंबईतील ऐरोली येथील नॅशनल बर्न केअर हॉस्पिटलमध्ये हलवण्याची मागणी केली. याबाबत आयुध निर्माणीचे महाप्रबंधक एस. चटर्जी यांनी सहमती दर्शविली आहे.