जळगाव - माजी सैनिकाला मारहाण केल्याप्रकरणी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार उन्मेष पाटील यांच्यासह त्यांच्या साथीदारांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबतचे आदेश नुकतेच काढले आहेत.
मुंबईत नौदलाचे माजी अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यानंतर जळगावातील माजी सैनिकाला भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी केलेल्या मारहाण प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. सोनू हिंमत महाजन असे मारहाण झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. ते जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र. चा. येथील रहिवासी आहेत. 2 जून 2016 रोजी टाकळी येथे सोनू महाजन आणि त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. आमच्याविरुद्ध सतत तक्रारी करतो, म्हणून संशयित आरोपी मुकुंद कोठावदे, भावेश कोठावदे, भारती कोठावदे, पप्पू कोठावदे, लक्ष्मीबाई कोठावदे, बबड्या शेख, भूषण उर्फ शुभम बोरसे, जितेंद्र वाघ आणि तत्कालीन आमदार व विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी मारहाण केल्याचा सोनू महाजन यांचा आरोप आहे. औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर या प्रकरणात 7 मे 2019 रोजी चाळीसगाव पोलीस ठाण्यात तत्कालीन आमदार उन्मेष पाटील यांच्यासह इतर नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणात गुन्हा दाखल झाला, तेव्हा राज्यात भाजपची सत्ता होती. त्यामुळे खासदार उन्मेष पाटील यांच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नव्हती, असा तक्रारदार सोनू महाजन यांचा आरोप आहे. मात्र, आता मुंबईतील नौदलाचे माजी अधिकारी मदन शर्मा यांच्या मारहाणीची घटना समोर आल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना दिले आहेत.