जळगाव - भाजपच्या जळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी जळगाव शहरचे आमदार सुरेश भोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना सोमवारी नियुक्तीपत्र दिले आहे. माजी खासदार हरिभाऊ जावळेंच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी कोणाची वर्णी लागते? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
भाजपचे ग्रामीण अध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे हे पद रिक्त होते. या पदावर कुणाची नियुक्ती होणार याबाबत उत्सुकता होती. यात अनेकांच्या नावाची चर्चा होती. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमदार सुरेश भोळे यांची नियुक्ती केली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्रही त्यांना देण्यात आले आहे. आमदार भोळे यांनी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय जीवनास प्रारंभ केला. 1999 ते 2000 मध्ये ते भाजपतर्फे जळगाव पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतर त्यांनी महापालिकेत भाजपचे विरोधी पक्षनेता म्हणूनही काम केले. त्यानंतर पक्षाने त्यांची जिल्हा महानगराध्यक्षपदी नियुक्ती केली, गेली 6 वर्षे ते महानगराध्यक्ष होते. पक्षाचे जिल्हा सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी दिली. शिवसेनेचे दिग्गज नेते सुरेश जैन यांचा त्यांनी पराभव केला. ते जायंट किलर ठरले. त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीतही त्यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली व ते दुसऱ्यांदा विजयी होवून जळगावचे पुन्हा आमदार झाले. पक्षाने आता त्यांना जळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.