जळगाव - बीएचआर पतसंस्थेत अवसायकाच्या काळातील गैरव्यवहार प्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी राज्यभर छापे टाकत अटक सत्र राबवले. या विषयासंदर्भात भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. 'बीएचआर प्रकरणात अटक केलेल्यांमध्ये अनेक निकटवर्तीय आहेत. आपण कर्ज भरल्याचे ते म्हणतात. तरीही त्यांना ताब्यात घेतले आहे. कायदेशीर कारवाई होत राहील', अशा शब्दात गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा - सोन्याची झळाळी फिकी, २ दिवसांत दीड हजारांची घसरण, 'हे' आहे प्रमुख कारण
भाजपच्या बैठकीसाठी आमदार गिरीश महाजन गुरुवारी दुपारी जळगावातील पक्ष कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली. बीएचआर पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी आज पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने राबवलेल्या अटकसत्रात जळगाव जिल्ह्यातील गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीयांचा समावेश आहे. याबाबत महाजन यांना पत्रकारांनी विचारणा केली असता, ते म्हणाले की, अटक झालेल्यांमध्ये सर्वच आमचे निकटवर्तीय आहेत. जामनेरचेही दोन ते तीन जण आहेत. दुरचे कुणी नाही. ज्यांना ताब्यात घेतले आहे त्यांचे म्हणणे आहे की आम्ही कर्ज भरलेले आहे. आता पुढे कायदेशीर कारवाई होत राहील, अशी सावध प्रतिक्रिया देत गिरीश महाजन यांनी अधिक बोलणे टाळले.
शिवसेनेवर टीकेचा बाण... म्हणाले शिवसेनेची वाटचाल अधोगतीकडे
राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष करीत गिरीश महाजन म्हणाले, शिवसेनेला केवळ विरोधाला विरोध म्हणून विरोध करीत आहे. काल मुंबईत जे झाले ते अतिशय वाईट आहे. शिवसेना आपल्या मूळ तत्वांपासून बाजूला जावून अशी भरकटेल, असा आम्ही स्वप्नात देखील विचार केला नसल्याचे गिरीश महाजन म्हणाले. काँग्रेस व एमआयएमच्या पुढे जावून शिवसेनेने हिंदुत्व विरोधी काम करण्यास सुरुवात केली आहे, असे वाटायला लागले आहे. प्रभू श्रीरामचंद्र हे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यांचे मंदिर व्हावे म्हणून संपूर्ण देशाने, मुस्लिमांनीही त्याचे स्वागत केले आहे. मात्र, हे शिवसैनिक वाटेल तसे तोंडसुख घेत आहेत. त्यांनाही माहीत आहे, विषय काय आहे? पण विरोधाला विरोध करावा म्हणून कुठल्याही विषयावर बोलायचे यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही. इतकी अधोगती शिवसेनेची कधीही झाली नाही, ती आज बघत आहोत, अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी टीकेचे बाण सोडले. श्रीराम मंदिराच्या मुद्द्यावरून काल भाजपचा मोर्चा गेला असता, सर्व शिवसैनिक तेथे जमले आणि त्यांनी हाणामारीला सुरुवात केली. सर्वांनी ते पाहिले आहे. कुणी विरोधात बोलले तर आम्ही त्याचे उत्तर देवू, लाठीकाठीने देवू ही भूमिका सत्ताधारी पक्षाची व शिवसेनेची झाली आहे. ती चुकीची आहे, असेही महाजन यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पुन्हा टीकास्त्र
कोरोनाच्या काळात गेल्या 15 महिन्यांत मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयाची पायरी ओलांडलेली नाही. या विषयावर काय बोलावे हेच कळत नाही. मुख्यमंत्री इतके दिवस मंत्रालयाचे तोंड बघत नसतील तर कामे कशी होणार ? फायलींचे ढिगचे ढिग पडलेले आहेत. त्यांच्यावर कसे कामे होणार? अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
हेही वाचा - जळगावात 12 तासात सोन्याचे दर 254 रुपयांनी घटले; जाणून घ्या, बुधवारचे दर...