जळगाव - मी शिवसेनेच्या संपर्कात आहे. शिवसेनेचे काही नेते देखील माझ्या संपर्कात आहेत, असे वक्तव्य भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केले आहे. खडसेंच्या या वक्तव्यामुळे भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली असून 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपमध्ये उभी फूट पडल्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वीच खडसेंनी धक्कादायक वक्तव्य केल्याने जिल्हा परिषदेत सत्तांतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड उद्या (शुक्रवारी) होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने काल (बुधवारी) महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जळगावात बैठक घेतली. यावेळी शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचीच सत्ता येणार असल्याचा दावा करत भाजप नेते एकनाथ खडसे हे खुद्द आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला होता. याच विषयासंदर्भात खडसेंशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. यासंदर्भात खलबते सुरू आहेत. शिवसेनेचे काही नेते माझ्या संपर्कात आहेत. मी देखील शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र, हा संपर्क जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या विषयापुरता मर्यादित आहे का, पक्षांतर करण्यासंदर्भात आहे, हे खडसेंनी स्पष्ट केले नाही. त्यामुळे खडसेंच्या वक्तव्याचे निरनिराळ्या प्रकारचे अर्थ लावले जात आहेत.