जळगाव - कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या काळात महावितरण कंपनीने ग्राहकांना वाढीव वीजबिले पाठवली आहेत. या कारणामुळे सध्या महावितरण कंपनीविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. सर्वसामान्य नागरिकच नाही तर बड्या राजकीय नेत्यांनाही महावितरण कंपनीने जास्त वीजबिले पाठवून झटका दिला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना मुक्ताईनगर येथील घरासाठी 1 लाख 4 हजार रुपयांचे वीजबिल आले आहे.
एकनाथ खडसे यांना त्यांच्या मुक्ताईनगर येथील घरासाठी महावितरण कंपनीने एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या काळासाठी 1 लाख 4 हजार रुपयांचे वीजबिल पाठवले आहे. हे घरगुती वीज कनेक्शन खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंच्या नावे आहे. जुलै महिन्यात एकत्रितपणे आलेले 1 लाख 4 हजार रुपयांचे वीजबिल पाहून एकनाथ खडसे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हे वीजबिल अवाजवी असले तरी खडसेंनी ते विहित मुदतीत भरले आहे. परंतु, महावितरण कंपनीने ग्राहकांना लॉकडाऊनच्या काळात पाठवलेली वीजबिले सर्वसामान्य माणसाला भरता येणार नाहीत. याप्रकरणी सरकारने चौकशी करावी आणि नागरिकांना सवलत द्यावी, अशी मागणी खडसे यांनी केली आहे.
महावितरणने सामान्य ग्राहकांना वेठीस धरू नये. अवास्तव वीज बिलांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे. सरकारने याची चौकशी करून वीजबिलात सूट द्यावी, अशी मागणी होत आहे. विरोधी पक्षाने देखील सरकारला या मुद्यावरून लक्ष्य केले पाहिजे आहे, असेही खडसे म्हणाले आहेत.