जळगाव - पारस ललवाणी हे वैफल्यग्रस्त आहेत. भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यावर ते बेछूट आरोप करत आहेत. त्यांच्या एकाही आरोपांमध्ये तथ्य नाही. त्यांच्याकडे गैरव्यवहारांचे काहीही पुरावे असतील तर ते जनतेसमोर मांडावेत, 'उचलली जीभ आणि लावली टाळूला' असे करू नये. अन्यथा आमच्याकडेही ललवाणी यांच्या कारनाम्यांचे ढीगभर पुरावे आहेत. वेळ आली की आम्ही त्यांच्या बुरखा फाडू, असा इशारा देत जामनेरचे भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी ललवाणी यांच्यावर जोरदार पलटवार केला.
जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी दोन दिवसांपूर्वी जामनेरात पत्रकार परिषद घेऊन भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यावर बीएचआर पतसंस्था व नगरपालिकेतील कथित गैरव्यवहार, विरोधकांवरील गुन्ह्यांबाबत गंभीर आरोप केले होते. त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी आज सायंकाळी जामनेर तालुका भाजपाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी चंद्रकांत बाविस्कर बोलत होते. याप्रसंगी भाजपाचे नगरपालिकेतील गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, बांधकाम सभापती महेंद्र बाविस्कर, नगरसेवक प्रा. शरद पाटील आदी उपस्थित होते.
ललवणींकडून जनतेची दिशाभूल
चंद्रकांत बाविस्कर पुढे म्हणाले, पारस ललवाणी हे तथ्यहीन आरोप करून जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यांच्याकडे बोलायला विषयच उरलेले नाहीत. जामनेर शहराचा सर्वांगीण विकास झाल्यामुळे त्यांचे काळेधंदे थांबले आहेत. याच द्वेषातून ते गिरीश महाजन यांच्यावर आरोप करत सुटले आहेत. खोटेनाटे आरोप करून ते प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, असे बाविस्कर यांनी सांगितले.
तुमच्यावर दाखल झालेले गुन्हे, ही तर तुमच्या कर्माची फळे
गिरीश महाजन यांनी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, असा पारस ललवाणी यांनी आरोप केला आहे. परंतु, त्यात तथ्य नाही. ललवाणी यांच्यावर त्यांच्या कर्मानेच गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांनी काय-काय काळेधंदे केले आहेत, त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. वेळ आली की ते समोर आणू. तालुक्याच्या सर्वांगीण विकासामुळेच जनता गिरीश महाजनांच्या पाठीशी आहे. नगरपालिकाच नव्हे तर ग्रामपंचायत असो किंवा पंचायत समितीवर म्हणूनच भाजपची एकहाती सत्ता आहे. कोणत्याही पुराव्यांशिवाय आरोप करणे चुकीचे आहे. पुरावे असतील तर समोर आणा, असे आव्हान बाविस्कर यांनी ललवाणी यांना दिले.
नगरपालिकेत कोणताही भ्रष्टाचार नाही
यावेळी गटनेते डॉ. प्रशांत भोंडे म्हणाले, नगरपालिकेत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही. बीओटी तत्त्वावरील व्यापारी संकुले नियमानुसारच आहेत. ललवाणी यांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही. त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी थेट गैरव्यवहार समोर आणावा, असे त्यांनी सांगितले.
नुसत्या घोषणा नाही तर प्रत्यक्षात विकास
लोकांमध्ये चुकीची माहिती जाऊ नये म्हणून आम्ही पत्रकार परिषद घेऊन तथ्य जनतेसमोर मांडत आहोत. जामनेर शहराचा खऱ्या अर्थाने विकास झाला आहे. नुसत्या घोषणा नाही तर प्रत्यक्षात विकास झाला आहे. म्हणूनच ललवाणी यांना पोटशूळ झाला आहे. गिरीश महाजन यांच्यावर आरोप करून त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न होत आहे. पुरावे असतील तर जरूर जनतेसमोर मांडावे. तालुक्याचे नाव बदनाम होत आहे. चुकीचे आरोप करून जनतेची दिशाभूल करू नका, असे महेंद्र बाविस्कर म्हणाले.
हेही वाचा - जळगावात 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत संचारबंदी, ३१ डिसेंबरला नगरपालिका क्षेत्रातही कर्फ्यू
हेही वाचा - रब्बीची पेरणी जळगाव जिल्ह्यात अंतिम टप्प्यात; सूर्यफुलाची सुमारे 300 हेक्टरवर लागवड