जळगाव : महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जळगावचे राजकीय वर्तुळ पूर्णपणे ढवळून निघाले आहे. सत्तासंघर्ष आता अधिक रंजक होत चालला आहे. आज (सोमवारी) दुसऱ्या दिवशी शिवसेनेपाठोपाठ भाजपनेही आपले उमेदवार जाहीर न करताच व्हीप काढला. पक्ष जाहीर करेल त्या उमेदवारांना मतदान करण्याचे व्हीपमध्ये म्हटले आहे. बंडखोरी करणाऱ्या नगरसेवकांची पक्षीय अडचण अडचण करण्यासाठी भाजपने ही खेळी केली आहे. आता या सत्तासंघर्षात पुढे काय होते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महापौर व उपमहापौर पदासाठी गुरुवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी महासभेत हजर राहून व भाजपतर्फे देण्यात येणाऱ्या उमेदवाराला मतदान करण्याबाबत भाजपकडून आपल्या नगरसेवकांना व्हीप बजावण्यात आला आहे. २५ नगरसेवकांना रविवारी विमानतळावर झालेल्या बैठकीत प्रत्यक्ष हातात व्हीपचे पत्र देण्यात आले होते. तर सोमवारी उर्वरित नगरसेवकांना व्हॉटसॲप, ईमेल, पोस्ट व प्रत्यक्ष घरपोच या पद्धतीने व्हीप बजावण्यात आले आहेत. भाजपचे गटनेते भगत बालानी यांनी हा व्हीप काढला आहे.
भाजपकडून कायदेशीर बाजूंची सुरू आहे पडताळणी-
भाजपकडून बंडखोर नगरसेवकांना परत आणण्यासाठी कायद्याच्या चौकटींचा अभ्यास केला जात आहे. अनेक नगरसेवक व्हीप न घेताच सहलीला रवाना झाले आहेत. यामुळे भाजपकडून अशा नगरसेवकांना व्हॉटसॲप, ईमेल व अन्य माध्यमांद्वारे व्हीप पाठवण्यात आला आहे. ऐनवेळी नगरसेवकांकडून व्हीप न मिळण्याचे कारण राहू नये म्हणून भाजपकडून अनेक मार्गांनी नगरसेवकांपर्यंत व्हीप बजावण्यात आले आहेत.
निवडणूक होणार ऑनलाईन; भाजपच्या अडचणी वाढल्या-
गुरुवारी होणारी निवडणूक ही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती नगरसचिव सुनील गोराणे यांनी दिली आहे. या निवडणुकीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे काम पाहणार आहेत. ही निवडणूक प्रक्रिया ऑनलाईन होणार असल्याने उमेदवारांव्यतिरिक्त इतर नगरसेवक आहे, त्या ठिकाणाहून मतदान करू शकणार आहेत. ही निवड आवाजी मतदानाद्वारे किंवा प्रत्येक नगरसेवकाची मंजुरी घेऊन होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन पद्धतीने ही निवडणूक होणार असल्याने नगरसेवकांना मनपात किंवा जळगाव शहरात देखील येण्याची गरज पडू शकत नाही. ज्या ठिकाणी नगरसेवक आहेत, तेथून ते सभेत सहभागी होवू शकतात, यामुळे या सभेचा फायदा विरोधकांना होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेने घेतले आठ अर्ज-
भाजपचे काही नगरसेवक फुटल्याने शिवसेनेच्या आशा पल्लवित झाल्या असून, सोमवारी शिवसेनेकडून महापौर व उपमहापौर पदासाठीचे प्रत्येकी चार असे एकूण आठ अर्ज घेण्यात आले आहेत. यावेळी नगरसेवक नितीन बरडे, प्रशांत नाईक, अमर जैन आदी उपस्थित होते.