जळगाव - पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाचा बळी ठरलेले जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी खासदार ए. टी. पाटील हे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने ते प्रकाशझोतात आले आहेत. पाटील हे भाजपकडून उमेदवारी करणार असून, जिल्ह्याच्या राजकारणात त्यांच्या भूमिकेची चर्चा रंगली आहे.
2019 मध्ये भाजपने कापले होते तिकीट
ए. टी. पाटील यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे सलग दोन टर्म प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, 2019 मध्ये पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळे त्यांची उमेदवारी पक्षाने कापली होती. याच कारणामुळे पाटील हे गेल्या 3 वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दुरावलेले होते. भाजपच्या व्यासपीठावर ते कुठेही दिसले नव्हते. मात्र, आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ते प्रकाशझोतात आले आहेत. विशेष म्हणजे, ते भाजपकडून उमेदवारी करत आहेत.
ए. टी. पाटील हे आहेत विद्यमान संचालक
माजी खासदार ए. टी. पाटील हे जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक आहेत. मागच्या संचालक मंडळात ते भाजपकडून ओबीसी मतदारसंघातून जिल्हा बँकेवर निवडून आले होते. आताही ते भाजपकडून ओबीसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मी भाजपपासून दुरावलेलो नाहीच
मी भाजपात सक्रिय आहे. पक्षाचे काम करत असून, पक्षापासून दुरावलेलो नसल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. सर्वपक्षीय पॅनल फिस्कटल्याने सर्व पक्षांचे इच्छुक उमेदवार आज अर्ज दाखल करतील. दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असून, त्यामुळे शेवटच्या दिवशी अर्जांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - एकाच सापाने सख्या बहिण-भावाचा घेतला बळी