जळगाव - भाजपाच्या केंद्रीय कार्यकारिणीत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना डच्चू देण्यात आला आहे. दुसरीकडे, या कार्यकारिणीत पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना संधी देण्यात आली आहे. त्यांचे राजकीय पुनर्वसन भाजपाने केल्याचे दिसत आहे. एकनाथ खडसेंना पुन्हा डावलण्यात आल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे समर्थकांकडून बोलले जात आहे.
भाजपाने नव्या केंद्रीय कार्यकारिणीची आज घोषणा केली. यात राज्यातील सहा नेत्यांना संधी देण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नव्या केंद्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची नावे जाहीर केली.
राज्यातील या नेत्यांचा कार्यकारिणीत समावेश
भाजपाच्या केंद्रीय कार्यकारिणीत राष्ट्रीय मंत्री म्हणून पंकजा मुंडे, विनोद तावडे, विजया रहाटकर व सुनील देवधर यांना संधी देण्यात आली आहे. याशिवाय, अल्पसंख्याक मोर्चाची जबाबदारी जमाल सिद्दीकी यांना देण्यात आली आहे. राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून महाराष्ट्र राज्यातील दोघांचा समावेश आहे. त्यात नंदुरबारच्या खासदार हिना गावित आणि मुंबईतील संजू वर्मा यांची निवड झाली आहे. या कार्यकारिणीत खासदार पूनम महाजन यांना वगळण्यात आले आहे. महाजन यांच्याऐवजी तेजस्वी सूर्या यांना युवा मोर्चाची जबाबदारी देण्यात आली आहे.
यापूर्वी, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य कार्यकारिणी जाहीर केली होती. या कार्यकारिणीत एकनाथ खडसे, पंकजा मुंडे व विनोद तावडे यांना संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. मात्र, तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे व विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाईल, असे सांगितले होते. आज जाहीर झालेल्या नव्या केंद्रीय कार्यकारिणीत खडसेवगळता मुंडे आणि तावडे यांचा समावेश करून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.
एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. दुसरीकडे, खडसेंना केंद्रीय कार्यकारिणीतून डावलण्यात आल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. एकनाथ खडसेंच्या पक्षांतराची चर्चा सुरू असल्याने त्यांना डावलले की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.