जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. तरीही त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप करत जळगावात गुरुवारी दुपारी भाजपने आंदोलन केले. यावेळी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मेहबूब शेख यांच्या पोस्टरला काळे फासले. शहरातील टॉवर चौकात हे आंदोलन करण्यात आले. तसेच शहरातील बळीराम पेठेतील वसंतस्मृती कार्यालयापासून भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मेहबूब शेख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढला.
काय आहे प्रकरण -
औरंगाबाद शहरातील बायजीपुरा भागात राहणाऱ्या खासगी शिकवणी घेणार्या 29 वर्षीय महिलेला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप मेहबूब शेख यांच्यावर करण्यात आला आहे. सिडको पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत तरुणीने बलात्काराचा आरोप केला आहे. १४ नोव्हेंबरला मुंबईला जाण्याचे कारण सांगत त्या तरुणीला जालना रोडवरील हॉटेल रामगिरी समोर बोलावले. ती महिला रात्री नऊच्या सुमारास रामगिरी हॉटेल समोर पोहोचले असता, मेहबूब शेख कार घेऊन तेथे उभे होते. तरुणी मागील सीटवर बसली असता, त्यांनी वसंतराव नाईक कॉलेजजवळ निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी -
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला व युवती सुरक्षित नसल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने एखाद्या महिलेवर अत्याचार करणे हे निश्चितच धक्कादायक आहे. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे यांनी केली. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने एका शिक्षिकेवर अत्याचार केला आहे. ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही. या घटनेची तातडीने चौकशी होऊन दोषींना शिक्षा झाली पाहिजे, असे भाजपा नेत्या दीप्ती चिरमाडे यांनी म्हटले.
हेही वाचा - अॅमेझॉननंतर 'डॉमिनोज'ही मराठीचा वापर करणार, मनसेची मागणी मान्य