जळगाव - कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून राज्य शासनाच्या निर्देशानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे. या विद्यापीठातील सर्व शैक्षणिक प्रशाळा आणि संलग्न महाविद्यालयांमधील अध्यापनाचे कामकाज 16 मार्चपासून ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहे. विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही. पवार यांनी यासंदर्भात रविवार परिपत्रक जारी केले आहे.
विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी, खासगी शाळा व महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्या अनुषंगाने विद्यापीठ आणि संलग्नित सर्व महाविद्यालयातील अध्यापनाचे कामकाज ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहे.
हेही वाचा -जळगावात कोरोनाच्या संशयावरून एका रुग्णाचे घेतले नमुने; अफवेमुळे नागरिकांमध्ये भीती
या काळात विद्यार्थ्यांनी वर्गास उपस्थित राहू नये. मात्र, इतर शैक्षणिक कामकाज सुरू राहणार असल्याने विद्यापीठ व महाविद्यालयांतील सर्व शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांनी नेहमीप्रमाणे कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे. या कालावधीत विद्यापीठाच्या असलेल्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा मात्र वेळापत्रकानुसार सुरू राहतील.
वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सुरक्षितते संदर्भात आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी. या काळात परीक्षा नसेल, असे विद्यार्थी वसतिगृह अधिक्षकांच्या अनुमतीने आपल्या मुळ गावी जाऊ शकतात.
हेही वाचा -शेअर बाजार कोसळल्याने सोन्याची झळाळी उतरली; जळगावात सोने दीड हजाराने स्वस्त
आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही, यासाठी आवश्यक ती दक्षता प्राचार्य, संचालक व विभागप्रमुख यांनी घ्यावी. तसेच, विद्यापीठ व महाविद्यालयातील व्यायामशाळा, जलतरण तलाव या कालावधीत बंद ठेवावे, असे या परिपत्रकात विद्यापीठाने म्हटले आहे.