जळगाव - जिल्ह्यातील पारोळा शहरात घडलेल्या 20 वर्षीय तरुणीवरील सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी शिवनंदन शालिक पवार (रा. टोळी, ता. पारोळा) यानेही विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. 9 नोव्हेंबरला पीडित तरुणीला गंभीर अवस्थेत उपचारासाठी पारोळ्याहून धुळ्याला हलवल्यानंतर त्याने हा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
या घटनेप्रकरणी पीडित मुलीच्या मामाने पारोळा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तीन तरुणांसह एका महिलेवर अपहरण, सामूहिक अत्याचारासह अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने टोळी येथील रहिवासी असलेल्या दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. संशयित आरोपी पप्पू पाटील याला सेंधवा येथून परत येताना शिंदखेडा येथे पोलिसांनी ताब्यात घेतले. तर प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी असलेल्या शिवनंदन पवार याने भीतीपोटी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर धुळ्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पीडित तरुणीच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर या प्रकरणातील अनेक बाबींचा उलगडा होणार आहे. पोलीस तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिली आहे.
हेही वाचा - जळगाव : दिवाळीसाठी मामाकडे आलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार; विष पाजल्याने पीडितेचा मृत्यू
सर्वांचे कॉल रेकॉर्ड तपासले जाणार -
या घटनेसंदर्भात अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी सांगितले की, या घटनेत तीन संशयितांनी तरुणीवर अतिप्रसंग केल्याची तक्रार फिर्यादीत नमूद करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. पीडित तरुणी किती वाजता घरातून गेली? ती कोणाच्या संपर्कात आली? त्याचप्रमाणे आरोपी कोणाकोणाच्या संपर्कात होते? त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात येणार आहेत. संशयितांचे लोकेशनदेखील शोधले जाणार आहे. त्यातून महत्त्वपूर्ण बाबी समोर येतील, असेही डॉ. मुंडे यांनी सांगितले. हे प्रकरण गंभीर असल्याने कोणत्याही बाबतीत तपासात हलगर्जीपणा होणार नाही, असे आश्वासनही डॉ. मुंडे यांनी यावेळी दिले.
पीडितेवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार -
पीडितेच्या मृतदेहावर मंगळवारी सायंकाळी उशिरा धुळे जिल्हा रुग्णालयात त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थित 'इन कॅमेरा' शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे पारोळा येथे आणण्यात आला. पोलीस बंदोबस्तात रात्री उशिरा पीडितेवर तिच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले, अशी माहिती पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.