जळगाव- पोलिसांनी चाळीसगाव तालुक्यात गुटखा वाहतूक करणारा ट्रक पकडला. मात्र तो ट्रक त्याचठिकाणी जप्त न करता जळगावात आणण्यात आला होता. या प्रकरणात मेहुणबारे पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकासह सात पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी ही कारवाई केली. अधीक्षकांनी बुधवारी रात्री उशिरा याबाबतचे आदेश काढले.
मेहुणबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नारायण पाटील, हवालदार रामचंद्र बोरसे, प्रवीण हिवराळे, महेश पाटील, मनोज दुसाने, पोलीस मुख्यालयातील नटवर जाधव व मेहुणबारे पोलीस ठाण्याचे रमेश पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी बुधवारी रात्री निलंबनाचे आदेश काढले.
आमदार मंगेश चव्हाण यांनी केला ट्रकचा पाठलाग
१६ ऑक्टोबरच्या रात्री (एमएच १८ एम ०५५३) क्रमांकाच्या ट्रकमधून ६६ लाख ८६ हजार ९९९ रुपयांचा गुटखा धुळ्याहून मेहुणबारेकडे आणला जात होता. यावेळी स्थानिक गुन्हे शाखा व मेहुणबारे पोलीस ठाण्याच्या पथकाने चाळीसगाव तालुक्यात हा ट्रक अडवला. चौकशी केल्यानंतर हा ट्रक मेहुणबारे पोलीस ठाण्यात जप्त न करता जळगावात आणला जात होता. ही माहिती चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित ट्रकचा पाठलाग केला. पहाटेच्या वेळी हा ट्रक जळगाव शहरातील शिरसोली रोड परिसरात चव्हाण यांनी अडवला होता. यावेळी ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेची असल्याची माहिती पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी आमदार चव्हाण दिली होती.
पोलीस कर्मचारी ट्रक सोडून देण्याच्या तयारीत
दरम्यान, आमदार चव्हाण यांनी या कारवाईबाबत संशय व्यक्त केला होता. पोलीस कर्मचारी हा ट्रक सोडून देण्याच्या तयारीत होते, असा आरोप करीत त्यांनी १७ ऑक्टोबर रोजी सकाळी हा ट्रक जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आणला होता. तेथे त्यांनी स्वतंत्र तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तक्रार घेतली नाही. परंतु, चव्हाण यांचा सविस्तर जबाब घेण्यात आला होता. हे सर्व प्रकरण संशयित असल्यामुळे चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांच्याकडे चौकशी सोपण्यात आली होती. चव्हाण यांनी संबंधित सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जबाब घेतले होते. यानंतर बुधवारी रात्री एपीआय बेंद्रे यांच्यासह सात कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.
हेही वाचा- मुंबईत ३० लाखाचे एमडी ड्रग जप्त
हेही वाचा- वर्ध्यात कांद्याच्या ट्रकचा दिखावा करत दारू वाहतूक, १२ लाखाचा मुद्देमाल जप्त