जळगाव - केंद्रीय निवडणूक आयोगाने 21 सप्टेंबरला विधानसभा निवडणूक जाहीर केल्यानंतर आज 21 ऑक्टोबरला जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मतदान होत आहे. यात जिल्ह्यातील दिग्गजांचे नशीब मतपेटीत बंद होणार आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. मात्र, याचवेळी मतदानावर पावसाचे सावट राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हेही वाचा - विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज; मतदान केंद्रांवर साहित्य रवाना
जळगावसह खान्देशातील 164 उमेदवारांचे भवितव्य आज (सोमवारी) मतदान यंत्रांत बंद होणार आहे. यातील जिल्ह्यातील 11 जागांसाठी 100 उमेदवार विधानसभेच्या रिंगणात आहेत. यात प्रामुख्याने भाजपचे गिरीश महाजन, हरिभाऊ जावळे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे तसेच शिवसेनेचे गुलाबराव पाटील, किशोर पाटील राष्ट्रवादीचे डॉ. सतीश पाटील यांचा समावेश आहे. तसेच एकूण 11 मतदारसंघातील 5 संघातील एकूण 10 महिला उमेदवारांना यावेळी संधी देण्यात आली आहे.
हेही वाचा - गुलाबराव पाटील समर्थकांची भाजप कार्यकर्त्याला मारहाण
2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यात 31 लाख 25 हजार 152 मतदार होते. त्यात आता 3 लाख 22 हजार मतदारांची भर पडली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या 34 लाख ४७ हजार 184 मतदार निवडणूकीला सामोरे जाणार आहेत. यावेळी विधानसभा निवडणूकीसाठी काही बंडखोरांमुळे निवडणूकीत चुरस निर्माण झाली आहे. तर मतदार राजा यातील कोणाला संधी देणार, हे येत्या 24 ऑक्टोबर रोजी निवडणूक निकालाच्या दिवशी कळणार आहे.