जळगाव - विमानतळावरुन येत्या १ जूनपासून सुरू हाेणाऱ्या प्रवासी सेवेसाठी वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात आले आहे. कुसुंबा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पाच ते सहा जणांना विमानाने येणाऱ्या प्रवाशांच्या वैद्यकीय तपासणीसाठी नियुक्त करण्यात आले आहे. शनिवारी डीवायएसपी निलाभ राेहन यांनी विमानतळाला भेट देऊन फिजिकल डिस्टन्सिंगसह इतर सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी करून सूचना दिल्या.
लाॅकडाऊनमुळे गेल्या दाेन महिन्यांपासून थांबवण्यात आलेली विमानसेवा १ जूनपासून सुरू करण्याचे नियाेजन आहे. त्यासाठी चार दिवसांपासून स्थानिक विमान प्राधिकरण व विमान कंपनीतर्फे फिजिकल डिस्टन्सिंगबाबत आवश्यक त्या उपाययाेजना, तसेच कामाची रंगीत तालीम करीत आहे. येथील स्टाफ व सुरक्षारक्षक यांची आराेग्य तपासणी करण्यात आली आहे. १ जूनपासून आठवड्यातून मंगळवार, गुरुवार व शनिवार या ३ दिवशीच मुंबईसाठी तर अमदाबादसाठी सहा दिवसांसाठी विमानसेवा पुरवण्यात येणार आहे.
सहा जणांची मेडिकल टीम
विमानसेवेतून विषाणुचा प्रसार हाेऊ नये यासाठी विमानाने जळगावात दाखल हाेणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी कुसुंबा येथील वैद्यकीय रुग्णालयाचे सीएचओ डाॅ. महाजन यांच्यासह सहा जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाेबत अंगणवाडी सेविकांचीही नेमणूक जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. एन. एस. चव्हाण यांनी केली. विमानाने येणाऱ्या प्रवाशांना हाेम क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात येणार आहे.
डीवायएसपींनी केली सुरक्षेसाठी विमानतळाची पाहणी
जळगाव विमानतळावरुन विमानसेवा सुरु हाेणार असल्याने तेथे सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययाेजना करण्यात आल्या आहेत. पाहणी करण्यासाठी पाेलिस उपअधिक्षक निलाभ राेहन यांनी शनिवारी विमानतळाला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी प्रवाशांच्या येण्याच्या व जाण्याच्या मार्गावरवरील उपाययाेजनांबाबत सूचना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली.