जळगाव - गेल्या ३ ते ४ वर्षांपासून भीषण दुष्काळाच्या दृष्टचक्रात अडकलेल्या जळगाव जिल्ह्यात यावर्षी पाण्यासोबत जनावरांच्या चाऱ्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. दुष्काळामुळे पशुपालकांसमोर मार्च महिन्यातच जनावरांच्या चाऱ्याचे संकट उभे राहिले आहे. कोरड्या चाऱ्याच्या १०० पेंढ्यांसाठी तब्बल ६ ते ७ हजार रुपये मोजावे लागत असल्याने अनेकांनी आपले पशुधन विक्रीसाठी काढले आहे. चाऱ्याच्या समस्येमुळे ग्रामीण भागातील दुग्धव्यवसायही धोक्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात यावर्षी वार्षिक सरासरीच्या अवघा ६३ टक्के पाऊस पडला आहे. त्यातही जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील ज्वारीच्या पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला. ज्वारी पिकाचे उत्पादन यावर्षी घटल्यामुळे जनावरांना लागणारा चारा शेतकऱ्यांना कमी प्रमाणात उपलब्ध झाला. चाऱ्याची टंचाई असल्याने शेतकरी आता जनावरे पाळावी कशी, या विवंचनेत आहेत. खरीप हंगामात उपलब्ध झालेला चारा दुष्काळामुळे फेब्रुवारीच्या अखेरीस संपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता चाऱ्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे. एप्रिल, मे आणि जूनमध्ये तर परिस्थिती अजून बिकट होईल, त्यामुळे शासनाने चाऱ्याच्या छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.
दूध देणाऱ्या जनावरांना अधिक प्रमाणात चारा लागतो. बाजारात कडब्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कोरड्या चाऱ्याची एक पेंडी ६० ते ७० रुपयांना मिळते आहे. म्हणजेच, चाऱ्याच्या १०० पेंड्यांसाठी सहा ते सात हजार रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागत आहेत. यावर्षी शासनाने ज्वारीला १५०० रुपये प्रतिक्विंटल तर कापसाला साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव दिला. मात्र, आता चारा त्यापेक्षा जास्त दराने विकला जात आहे.
चाऱ्याचे गगनाला भिडलेले भाव परवडत नसल्याने इच्छा नसताना ग्रामीण भागातील पशुपालकांना दुधाळ जनावरे विकावी लागत आहेत. काही पशुपालकांची शेत शिवारातील उसाचे कुजलेले पाचट, गवत आणून जनावरे वाचवण्याची धडपड सुरू आहे. काहींनी तर पशुधन वाचावे म्हणून आपल्या नातेवाईकांकडे पाठवले आहे. एकंदरीत, भीषण दुष्काळामुळे माणसाप्रमाणे मुक्या जनावरांची ससेहोलपट सुरू असल्याचे विदारक चित्र जळगावात आहे.