जळगाव - जिल्ह्यातील भडगाव येथील टोणगाव भागातील रहिवासी सैन्य दलाचे जवान निलेश रामभाऊ सोनवणे (वय 30 वर्षे) यांना लेह-लडाखमध्ये वीरमरण आले आहे. 10 जुलैला ही घटना घडली. निलेश यांचे पार्थिव मंगळवारी (13 जुलै) सकाळी त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कारासाठी दाखल होण्याची शक्यता आहे.
2010 मध्ये झाले होते सैन्यात भरती
निलेश सोनवणे हे सन 2010 मध्ये सैन्यात भरती झाले होते. सध्या ते लेह-लडाखमध्ये कार्यरत होते. कर्तव्यावर असताना त्यांना 10 जुलैला त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर त्यांना तातडीने सैन्य दलाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. यासंदर्भात सैन्य दलाकडून त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली.
शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
निलेश सोनवणे यांचे पार्थिव सोमवारी (12 जुलै) लेहवरून दिल्ली येथे दुपारी 2 वाजता पोहोचेल. तिथून सायंकाळी 5.30 वाजता औरंगाबादसाठी निघून औरंगाबाद येथे रात्री 8 वाजता पोहोचेल. त्यानंतर रुग्णवाहिकेने भडगावसाठी रवाना होईल. मंगळवारी (दि 13 जुलै) सकाळी 9 वाजेनंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती जळगाव जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक सुभेदार मेजर अनुरथ वाकडे यांनी दिली आहे.
हेही वाचा - एकनाथ खडसे पुन्हा 'ईडी'च्या फेऱ्यात; राजकीय पुनर्वसनात अडथळा येण्याची चिन्हे