जळगाव - शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज जळगावमध्ये पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांवर चौफेर फटकेबाजी केली. राऊत म्हणाले की पुढील निवडणुकीत 2024 साली आम्ही पुन्हा सत्तेवर येणार. याचा आपल्याला विश्वास असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी अजित पवार यांच्यासंदर्भात एका पत्रकाराने राऊत यांना प्रश्न विचारला. त्यावेळी अजित पवार यांच्यामध्ये मुख्यमंत्री बनण्याची क्षमता असल्याचे राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले. यावेळी पुढील निवडणुकीत शिंदे गटाचा सुपडा साफ होईल असेही राऊत म्हणाले.
सध्या सुरू असलेल्या राजकीय काराभारावरही संजय राऊत यांनी सडकून टीका केली. लायकी नसणारे लोक मुख्यमंत्री झाल्याची टीका राऊत यांनी केली. सरकारमध्ये समन्वय नसल्याचेही राऊत म्हणाले. मुख्यमंत्री नेमके कुठे आहेत तेही समजत नाही असा टोलाही राऊत यांनी लगावला. पुढील निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाचा पराभव नक्की होणार आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. नेतृत्व करण्यासाठी नुसत्या दाढी मिशा असून चालत नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला. मात्र मुख्यमंत्री पदाचा आता विषय नाही असेही राऊत म्हणाले. काहीजण लबाडी करुन सत्तेवर आले आहे, असा आरोप राऊत यांनी केला.
जळगावच्या सभेसंदर्भातही राऊत यांनी गुलाबराव पाटील यांना टोला लगावला. या सभेला तुफान गर्दी होईल असेही राऊत यांनी सांगितले. आम्ही जळगावात घुसलोय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सभेला गर्दी होईल असे सांगताना विरोधकांना आता विसरा असा सल्लाही त्यांनी पत्रकारांना दिला. एकप्रकारे गुलाबराव पाटील यांना राऊत यांनी आव्हान दिले आहे.
महाविकास आघाडीत फूट पडणार नाही असेही राऊत यांनी स्पष्ट केले. राज्यामध्ये महाविकास आघाडी मजबूत आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. अनेकदा विविध भाषणबाजी किंवा वक्तव्यांच्यामुळे अनेकदा विरोधाभास असणारी वक्तव्ये समोर येतात. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काही अलबेल नाही असे दिसून येते. त्यामुळे ही आघाडी फुटणार का, याबाबत प्रश्न विचारला असता राऊत यांनी राज्यातील महाविकास आघाडी भक्कम असल्याचा दावा राऊत यांनी केला.
हेही वाचा - Ajit Pawar Claim CM Post Now : अजित पवारांचे मोठे विधान; आताच मी मुख्यमंत्री होऊ शकतो