जळगाव - शहरात रविवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास अर्धा ते पाऊण तास मुसळधार पाऊस पडला. पावसामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत आलेल्या नागरिकांसह व्यावसायिकांची एकच तारांबळ उडाली. मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे वाहनधारकांना पाण्यातून वाट काढावी लागली.
हेही वाचा - ओझरमध्ये पहाटेच्या सुमारास दोन बिबट्यांचे आगमन, थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
दिवाळीला सुरुवात झाली आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झालेली आहे. रविवारी दुपारी अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने बाजारपेठेत एकच धावपळ उडाली. पावसामुळे अनेक छोट्या व्यावसायिकांचे मालाचे नुकसान झाले. ग्राहकांची देखील तारांबळ उडाली. जिल्ह्यात यावर्षी पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. वार्षिक सरासरीचा विचार केला तर जिल्ह्यात सुमारे 663 मिलीमीटर इतका पाऊस पडतो. मात्र, यावर्षी दिवाळी आली तरी पाऊस थांबण्याची चिन्हे नाहीत.
हेही वाचा - ऐन दिवाळीत प्लास्टिक गोडाऊनला भीषण आग, बाजूची चार दुकानेही भस्मसात
आतापर्यंत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात 100 ते 125 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. संपूर्ण जिल्ह्यात झालेल्या पावसाच्या टक्केवारीचा विचार केला तर आतापर्यंत सुमारे 135 ते 140 टक्के इतका पाऊस झाला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच लघू व मध्यम सिंचन प्रकल्प 100 टक्के क्षमतेने भरले आहेत. नद्या, नाले देखील तुडूंब भरून वाहत आहेत. पावसामुळे दुष्काळ हद्दपार झाला आहे. मात्र, अजूनही उघडीप मिळत नसल्याने खरीप हंगाम हातून जाण्याची भीती आहे.
वाघूर धरणाचे 20 दरवाजे उघडले -
गेल्या आठवडाभरापासून जिल्हाभरात सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. वाघूर नदीच्या उगमस्थळी झालेल्या दमदार पावसामुळे वाघूर धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे रविवारी सकाळी या धरणाचे सर्व 20 दरवाजे उघडण्यात आले. धरणातून 33438 क्यूसेसने पाणी सोडण्यात आले आहे.
शेतीपिकांचे मोठे नुकसान -
जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सततचे ढगाळ वातावरण आणि रिमझिम पडणाऱ्या या पावसामुळे पिके अक्षरश: सडायला लागल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आतापर्यंत जिल्हाभरात 133 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. मध्यंतरीच्या कालखंडात उन पडल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी ज्वारीची काढणी केली होती, त्यांच्या हाती केवळ 15 ते 20 टक्के ज्वारी लागली, तर 80 ते 85 टक्के ज्वारीचे पूर्णत: नुकसान झाले आहे. यासह कपाशीला प्रथमच कोंब फुटण्याचे प्रकार होत आहेत. यावर्षी कपाशीची 5 लाख 10 हजार हेक्टरवर लागवड होती. यातील हलक्या जमिनीवरील कपाशीने तग धरला होता. मात्र, काळ्या कसदार जमिनीवरील कपाशीचे पूर्णत: नुकसान झाले आहे. पावसामुळे चारा पूर्णत: नष्ट झाला आहे. यासह सोयाबीन व अन्य पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.