जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगाने सुरू आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना जिल्ह्यात गेल्या आठवड्यात रेमडेसिवीर आणि टॉसिलीझुमॅब इंजेक्शनचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे या दोन्ही इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू होता. याबाबत तक्रारी येऊ लागल्याने अन्न व औषध प्रशासनाने तातडीने दखल घेतली. या दोन्ही इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने एक अभिनव शक्कल लढवली. कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचार सुरू असताना, त्या रुग्णाला बरे होईपर्यंत जेवढे रेमडेसिवीर आणि टॉसिलीझुमॅब इंजेक्शन लागली, त्यांची रिकामी बाटली आणि खोका संबंधित रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकांना बिल देतेवेळी परत करावेत, असे आदेशच अन्न व औषध प्रशासनाने काढले आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात आज दोन्ही इंजेक्शनचा काळाबाजार थांबून मुबलक साठा उपलब्ध आहे.
हेही वाचा - दर्यापूर तालुक्यातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये युवकासह दोघांचा नदीत बुडून मृत्यू
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरू आहे. सद्यस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 47 हजारांच्या पुढे आहे. त्यातही अडीचशेहून अधिक रुग्ण हे अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. अत्यवस्थ असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना रेमडेसिवीर आणि टॉसिलीझुमॅब इंजेक्शनची गरज भासत आहे. या दोन्ही इंजेक्शनची वाढती मागणी पाहता जिल्ह्यातील काही रुग्णालये तसेच मेडिकल चालकांनी रुग्णांची लूट सुरू केली होती. रेमडेसिवीर हे एक इंजेक्शन 20 ते 25 हजार रुपयांना विकले जात असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासनाने एक अनोखी शक्कल लढवली. कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सुरू असताना, त्या रुग्णाला बरे होईपर्यंत जेवढे रेमडेसिवीर आणि टॉसिलीझुमॅब इंजेक्शन लागली, त्यांची रिकामी बाटली आणि खोका संबंधित रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकांना बिल देतेवेळी रुग्णालयांनी परत करावेत, असे आदेशच अन्न व औषध प्रशासनाने काढले.
याशिवाय मेडिकल चालकांवर नियंत्रण रहावे म्हणून त्यांच्याकडे असलेला इंजेक्शनचा साठा, विक्री याबाबतचा दैनंदिन अहवाल दररोज घेण्यात येत आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर रुग्णाचे नाव, इंजेक्शन दिल्याची तारीख, त्याचे बिल ही कागदपत्रेही मेडिकल चालकांना अन्न व औषध प्रशासनाला दररोज सादर करावी लागत आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात या दोन्ही इंजेक्शनचा काळाबाजार थांबून मुबलक साठा उपलब्ध झाला आहे.
हेही वाचा - सुशांतच्या कुटुंबीयांची सीबीआय करणार पुन्हा चौकशी; एम्सच्या रिपोर्टचीही होणार पडताळणी
रेमडेसिवीर आणि टॉसिलीझुमॅब इंजेक्शनच्या विषयासंदर्भात 'ई टीव्ही भारत'शी बोलताना औषध निरीक्षक अनिल माणिकराव म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात सद्यस्थितीत या दोन्ही इंजेक्शनचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. जिल्ह्यातील 6 प्रमुख स्टॉकिस्टसह जिल्हा कोविड रुग्णालय तसेच विविध खासगी रुग्णालये, मेडिकल्स असे मिळून 23 ठिकाणी ही दोन्ही इंजेक्शन उपलब्ध आहेत. 27 सप्टेंबर रोजी रात्री उशिरापर्यंतच्या नोंदीनुसार जिल्ह्यात 1 हजार 244 रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध आहेत. तर, 513 इंजेक्शनची विक्री झाली होती, अशी माहिती अनिल माणिकराव यांनी दिली.
रेमडेसिवीर हे इंजेक्शन भारतातील 6 कंपन्या तयार करतात. तर टॉसिलीझुमॅब हे इंजेक्शन भारतात तयार होत नाही. ते परदेशातून आयात करावे लागते. यात गैरप्रकार होऊ नये म्हणून अन्न व औषध प्रशासनाने सहाही कंपन्यांना राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठ्याची माहिती देणे बंधनकारक केले आहे. ही माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या कंट्रोल रूममध्ये संकलित होते. तेथून ती जिल्हास्तरावर पाठवली जाते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या स्थानिक पातळीवर दररोजच्या पुरवठ्याची माहिती जाते, त्यानुसार डिलर्स आणि मेडिकलवर नजर ठेवता येते, असेही अनिल माणिकराव यांनी सांगितले.
दरांवरही नियंत्रण-
रेमडेसिवीर आणि टॉसिलीझुमॅबच्या दरांवरही नियंत्रण असल्याचा दावा औषध निरीक्षक अनिल माणिकराव यांनी केला. दोन्ही इंजेक्शनचा साठा मुबलक प्रमाणात असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची लूटमार होत नसल्याचे ते म्हणाले. रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्मिती वेगवेगळ्या कंपन्या करत असल्याने प्रत्येक कंपनीचे दर वेगवेगळे असल्याचे ते म्हणाले. सर्वसाधारणपणे रेमडेसिवीर इंजेक्शन 4 हजार 800 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे नसल्याचेही त्यांनी सांगितले. यापेक्षा कमी किमतीत आता हे इंजेक्शन उपलब्ध आहे. त्यामुळे जर कोणाला या इंजेक्शनच्या किमतीबाबत काही शंका असेल किंवा त्याचा काळाबाजार होत असेल तर, अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवली पाहिजे, असे आवाहन माणिकराव यांनी केले. इंजेक्शन खरेदी करताना मेडिकल चालकांकडून पक्के बिल घ्यावे, असेही ते म्हणाले.