जळगाव - जिल्हा उपकारागृहातील एका कैद्यास वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले असता त्याने मनोरुग्ण असल्याचा बनाव करत प्रचंड धिंगाणा घातला. या कैद्याने दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला चढवून त्यांना जखमी केले. सात-आठ लोकांकडूनही तो नियंत्रणात येत नव्हता. या प्रकारामुळे रुग्णालयात प्रचंड गोंधळ निर्माण होऊन भीती पसरली होती.
लकड्या आसाराम पावरा (वय 23 वर्षे, मुळ रा. खरगोन, मध्यप्रदेश), असे या कैद्याचे नाव आहे. वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मुख्यालयातील सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेश रघुनाथ पाटील (वय 56 वर्षे) व शेख सलीम शेख करीम (वय 51 वर्षे) या दोघांनी दुचाकीवरून पावरा याला दुपारी रुग्णालयात आणले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समोर केसपेपर भरत असतानाच त्याने मनोरुग्णासारखे हावभाव करण्यास सुरूवात केली. हे पाहून शेजारचे रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर त्या खोलीतून बाहेर पडले. यानंतर राजेश पाटील व शेख सलीम या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर नियंत्रण मिळण्याचा प्रयत्न केला. पण, पावरा पुर्णपणे वेडसरपणासारखे वागू लागला. त्याने थेट दोन्ही पोलिसांवर हल्ला चढवला.
हातातील लोखंडी बेडीने वार केले. यानंतर राजेश पाटील यांचे शर्ट फाडून मारहाण सुरू केली. त्यांच्या पाठीवर चावा घेतला. गुप्तांगावर मारहाण केली. पावरा याला आवरण्यासाठी गेलेल्या इतर पाच-सहा जणांचेही त्याने कपडे फाडले. शेख सलीम यांच्या उजव्या हातास चावा घेतला. पोलिसांनी त्याच्या हातात बेड्या टाकण्याचा प्रयत्न केला असता तो थेट मारहाण करीत होता. त्याने अंगावरील सर्व कपडे देखील काढून टाकले होते. पावरा हा कैदी असल्यामुळे पोलिसांनी त्याला मारहाण केली नाही. पोलिसांच्या याच नाईलाजाचा गैरफायदा घेऊन पावरा थेट त्यांच्यावर हल्ला करत होता.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खोलीत सुमारे दीड तास हा थरार सुरू होता. दोन्ही पोलीस कर्मचारी जीव मुठीत घेऊन पावरा याला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत स्वत:चाही बचाव करत होते. दीड तासांनंतर त्यांना जिल्हापेठ पोलीस ठाण्यातून बंदोबस्त उपलब्ध झाला. जिल्हापेठचे नाना तायडे, शेखर जोशी व हेमंत तायडे हे तीन कर्मचारी आल्यानंतर सर्व पोलिसांनी मिळून पावरावर नियंत्रण मिळवले. यानंतर पावरा याला रुग्णालयात दाखल करुन घेत उपचार सुरू झाले. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वत:वर उपचार करुन घेतले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते..
हेही वाचा - VIDEO : बारावीचा पेपर दिला.. पण आयुष्याच्या परीक्षेत नापास झाला, जळगावात विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू