जळगाव- जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. त्यामुळे बाधित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता कोरोनाची लक्षणे जाणवताच तपासणीसाठी स्वत:हून पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
जिल्ह्यातील कोरोना स्थितीची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके उपस्थित होते. शुक्रवारी (4 सप्टेंबर) जिल्ह्यात एकाच दिवशी 1063 नवीन बाधित रुग्ण आढळल्याने जनतेच्या मनात भीती निर्माण होऊ शकते. परंतु, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरोना संशयित रुग्णांची तपासणी वाढवण्यात आली आहे, असे अभिजीत राऊत यांनी सांगितले. नागरिकांनी घाबरू नये, स्वत:हून तपासणीसाठी पुढे येऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. अनलॉकच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी प्रतिबंधित क्षेत्राचा परिसर कमी करण्यात आला आहे. या क्षेत्रातील नागरिकांची तपासणी प्राधान्याने करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा-अतिवृष्टीचा तडाखा : जळगाव जिल्ह्यात 30 हजार हेक्टरवरील उडीद-मूगाचे नुकसान
जिल्ह्यात मृत्यू होत असलेले बाधित रुग्ण हे 60 वर्ष वयापेक्षा अधिकचे आहेत व त्यांना इतरही आजार आहेत. यावर मात करण्यासाठी मतदार याद्यांचा आधार घेऊन वयस्कर नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्या मृतदेहाची नातेवाईकांकडून ओळख पटवून घेतल्यानंतरच मृतदेह पॅक करण्यात येत आहे. याबाबतच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणांना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात मूग, उडीद, सोयाबीन पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे शेतात जाऊन लवकरात लवकर करण्याच्या सूचनाही सर्व संबधित यंत्रणांना दिल्या, असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.