जळगाव - लग्नाचे आमिष दाखवून एका २१ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जळगावात घडली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेंद्र ज्ञानदेव सोनवणे असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. संशयित आरोपी नरेंद्र याने पीडितेला हॉटेलात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
पीडित तरुणी ही शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तर नरेंद्र हा फोटोग्राफर असून त्याची तरुणीशी तिच्या महाविद्यालयात ओळख झाली होती. काही दिवसानंतर त्याने प्रेमाचा बनाव करत तिला लग्नाचे आमिष दाखवले. सप्टेंबर २०१९ मध्ये पीडितेला अजिंठा चौफुली परिसरातील एका हॉटेलात नेऊन अत्याचार केले. त्यानंतरही लग्नाचे आमिष देतच राहिला. दरम्यान, पीडितेने लग्न करण्याचा तगादा लावल्यानंतर नरेंद्र याने त्याच्याजवळ असलेले पीडितेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर दोनवेळा पीडितेवर अत्याचार केले. यानंतर पीडितेने मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार नरेंद्र विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर नरेंद्रला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.