जळगाव - घराशेजारी राहणाऱ्या महिलेने शेळीच्या अंगावर गरम पाणी फेकले. त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करा, अशी कैफियत घेऊन एक तरुण चक्क शेळीला सोबत घेऊन पोलीस ठाण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील यावल पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला आहे. तरुणाने चक्क शेळीच पोलीस ठाण्यात आणल्याने यावल पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली.
हेही वाचा - राष्ट्रगीताने होणार महाविद्यालयीन कामकाजाची सुरुवात, अंमलबजावणीला शिवजंयतीचा मुहूर्त
जुबेर दस्तगीर खाटीक असे पोलिसांकडे तक्रार घेऊन येणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो जळगाव जिल्ह्यातील यावल येथील खाटीक वाड्यातील रहिवासी आहे. माझ्या घराशेजारची महिला शेळीच्या अंगावर गरम पाणी फेकते. शेळीच्या वतीने माझी तक्रार घ्या आणि संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करून कारवाई करा, अशी मागणी जुबेर याने पोलिसांकडे केली. अनेकदा या महिलेकडून आपल्या शेळीवर गरम पाणी फेकले जाते. त्यामुळे शेळी दगावण्याची भीती असल्याची कैफियत जुबेर याने पोलिसांकडे मांडली. ही तक्रार नोंदवल्याशिवाय आपण पोलीस ठाण्यातून बाहेर जाणार नाही, अशी भूमिका त्याने घेतली होती. त्यामुळे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.
शेवटी पोलिसांनी संबंधित महिलेला समज देऊ, असे आश्वासन जुबेरला देत त्याची समजूत काढली. त्यानंतर तो शेळीला घेऊन घरी गेला. या प्रकाराची यावल शहरात जोरात चर्चा होत आहे.
हेही वाचा - 'चंद्रकांत पाटलांना खुर्चीचा दगा, शिवसेनेचे नाव घेताच पडता-पडता वाचले'