जळगाव - मार्केटमध्ये महिलांच्या अंगावर सौम्य अॅसिड फेकून सोनसाखळी ओरबाडणाऱ्या १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला रंगेहात पकडण्यात आले. ही घटना जळगाव शहरातील फुले मार्केटमध्ये घडली.
हर्षदा किशोर महाजन (वय १९,रा. बोदवड, जि. जळगाव) असे अटक केलेल्या तरुणीचे नाव आहे. हर्षदा हीने एका वकील तरुणीसह तिच्या बहिणीच्या अंगावर अॅसिड फेकले होते. अॅड. पूजा ओमप्रकाश व्यास (वय ३०, रा. बालाजीपेठ, जळगाव) या बहीण आरती व्यास हिच्यासोबत फुले मार्केटमध्ये खरेदीसाठी आल्या होत्या.
हेही वाचा - मनसेकडून ३६ किलोमीटर पायी फिरून होणार प्रचार; अविनाश जाधवांच्या 'इंजिन'ची मुसंडी
यावेळी हर्षदाने प्लॅस्टिकच्या बाटलीतील अॅसिड पूजा व आरतीच्या अंगावर फेकले. त्यांच्या मानेवर खाज सुटल्याने अॅड. पूजा यांनी मागे वळून पाहिले. तेव्हा हर्षदा अॅसिडच्या बाटलीस झाकण लावताना दिसून आली. हर्षदाला हटकल्यानंतर तिने थेट पूजाच्या गळ्यातील साडेपाच ग्रॅम वजनाची सोनसाखळी ओरबाडली.
हेही वाचा - नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघासाठी 36 उमेदवारांचे अर्ज वैध
पूजा व आरती यांनी आरडा-ओरडकरुन मार्केटमधील नागरिक व समोरच असलेल्या शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना गोळा केले. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण निकम, सुनील पाटील, वासुदेव सोनवणे भास्कर ठाकरे, सुधीर सावळे, प्रणेश ठाकूर, रवींद्र साबळे, नवजीत चौधरी यांनी फुले मार्केटमध्ये धाव घेतली. सर्वांनी मिळून हर्षदाला ताब्यात घेतले. अॅड. पूजा व्यास यांच्या फिर्यादीवरुन हर्षदाविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.