जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाच्या संसर्गाचा वेग काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. गुरुवारी रात्री जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या 4 हजार 171 तपासणी अहवालांमध्ये 954 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता वाढून 67 हजार 680 इतकी झाली आहे. दुसरीकडे, गुरुवारी देखील 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा बळी गेला. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 427 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आता पूर्वीप्रमाणेच वाढत चालला आहे. जिल्ह्यातील सर्वच 15 तालुक्यांमध्ये कोरोना हातपाय पसरत आहे. चिंतेची बाब म्हणजे, जळगाव शहर हे सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमुख हॉटस्पॉट आहे. जळगावात गुरुवारी एकाच दिवशी तब्बल 310 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले. गुरुवारी दिवसभरात 425 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. जळगाव शहरातील वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गुरुवारी रात्रीपासून जनता कर्फ्यूची अंमलबजावणी केली आहे. 15 मार्चला सकाळी 8 वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू लागू असणार आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवांवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.
अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 6 हजारांच्या पार -
जिल्ह्यातील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही वाढून 6 हजार 248 इतकी झाली आहे. 1 हजार 353 रुग्णांना लक्षणे आहेत. तर 4 हजार 895 रुग्णांना लक्षणे नाहीत. चिंतेची बाब म्हणजे जिल्ह्यातील मृत्यूदर हा 2.36 टक्के इतका आहे. पॉझिटिव्हिटी रेट देखील घसरून 88.66 टक्के आहे. सध्या 260 रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत, तर 156 रुग्ण हे आयसीयूत उपचार घेत आहेत.
जळगावात परिस्थिती गंभीर-
कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने जळगाव शहरात परिस्थिती गंभीर होत चालली आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह महापालिकेचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये बेड शिल्लक नाहीत. इकरा महाविद्यालयात असलेल्या कोविड सेंटरमध्ये मर्यादित बेड शिल्लक आहेत. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात देखील हीच स्थिती आहे. महापालिका प्रशासनाने खबरदारी म्हणून सिंधी कॉलनीतील वसतिगृहात कोविड सेंटर उभारले आहे. ते देखील फुल्ल होत आहे. दरम्यान, कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच असल्याने तातडीने बेड उपलब्ध करण्याचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
गुरुवारी असे आढळले रुग्ण-
जळगाव शहर | 310 |
जळगाव ग्रामीण | 42 |
भुसावळ | 70 |
अमळनेर | 18 |
चोपडा | 121 |
पाचोरा | 17 |
भडगाव | 21 |
धरणगाव | 57 |
यावल | 30 |
एरंडोल | 98 |
जामनेर | 31 |
रावेर | 9 |
पारोळा | 7 |
चाळीसगाव | 72 |
मुक्ताईनगर | 32 |
बोदवड | 15 |
इतर | 4 |