जळगाव- जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाचा उद्रेक कायम आहे. शुक्रवारी तर चिंताजनक आकडे समोर आले. एकाच दिवशी तब्बल 772 नव्या बाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील आजपर्यंतच्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढून 63 हजार 422 वर जाऊन पोहचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, शुक्रवारी 5 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, जिल्ह्यातील परिस्थिती पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच गंभीर होत चालली असून, आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आता नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.
जिल्हा प्रशासनाला शुक्रवारी रात्री प्राप्त झालेल्या तपासणी अहवालात तब्बल 772 नवे बाधित रुग्ण समोर आले. यात सर्वाधिक 359 रुग्ण हे एकट्या जळगाव शहरातील आहेत. जळगाव शहरात दररोज सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून जळगाव शहर हे कोरोनाचे प्रमुख हॉटस्पॉट आहे. जळगाव पाठोपाठ चाळीसगाव, चोपडा, एरंडोल, भुसावळ, अमळनेर या तालुक्यांमध्ये देखील कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे.
ऍक्टिव्ह रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे-
जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 4 हजार 126 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात 3 हजार 202 रुग्णांना कोरोनाची लक्षणे नाहीत, तर 924 रुग्णांना लक्षणे आहेत. शुक्रवारी जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात 108, भुसावळात 64, चाळीसगावात 51 तर एरंडोलमध्ये 48 रुग्ण आढळले आहेत.
आकडेवारीवर एक नजर-
- शुक्रवारी आढळलेले नवे रुग्ण- 772
- शुक्रवारी बरे झालेले रुग्ण- 246
- शुक्रवारी झालेले मृत्यू- 5
- होम क्वारंटाईन रुग्ण- 2915
- कोविड केअर सेंटरमधील रुग्ण- 287
- क्वारंटाईन सेंटरमधील रुग्ण- 91
- डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमधील रुग्ण- 501
- डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमधील रुग्ण- 423
- ऑक्सिजनवरील रुग्ण- 191
- आयसीयूतील रुग्ण- 134
- आजपर्यंतचे मृत्यू- 1401
- जिल्ह्याचा रिकव्हरी रेट- 91.29 टक्के
- जिल्ह्याचा मृत्यूदर- 2.36 टक्के
हेही वाचा- मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे - गृहमंत्री अनिल देशमुख