जळगाव - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने 14 एप्रिलपासून 'ब्रेक दि चेन' मोहिमेंतर्गत कडक निर्बंध घातले आहेत. यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, असे असताना काही नागरिक रात्रीच्या वेळी ठोस कारण नसताना घराबाहेर फिरतात. अशा लोकांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस व आरोग्य विभागाच्या वतीने सरप्राइज अँटिजेन टेस्ट केल्या जात आहेत. जळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात दीड हजार लोकांच्या सरप्राईज अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, त्यात 73 लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत.
सरप्राईज अँटीजन टेस्टमध्ये 73 जण पॉझिटिव्ह रस्त्यावर फिरणाऱ्याची अँटीजन टेस्ट राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाने 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजेपासून ते 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सोडून इतर बाबींवर कडक निर्बंध घातले आहेत. असे असले तरी काही नागरिक रात्रीच्या वेळी बाहेर फिरत आहेत. पोलीस प्रशासनाने आरोग्य विभागाच्या मदतीने अशा लोकांची रस्त्यावरच अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये प्रमुख शहरांत ही कारवाई सुरू आहे. शहरांमधील प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी करून रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांच्या अँटिजेन टेस्ट केल्या जात आहेत. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे.
पारोळा, बोदवडमध्ये आढळले सर्वाधिक पॉझिटिव्ह या कारवाई दरम्यान सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण हे पारोळा आणि बोदवड या तालुक्यांमध्ये आढळले आहेत. मागील दोन दिवसात पारोळ्यात 74 जणांची टेस्ट झाली. त्यापैकी 13 जण पॉझिटिव्ह आले आहे. तर बोदवड 132 पैकी 21 जण पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या 24 तासात जिल्ह्यात एकूण 1550 जणांच्या टेस्ट झालेल्या आहेत, त्यात 73 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह येणाऱ्यांची विलगीकरण केंद्रात रवानगी या कारवाईत जे नागरिक पॉझिटिव्ह आढळून येत आहेत, त्यांची तातडीने संबंधित शहरातील शासकीय विलगीकरण केंद्रात रवानगी केली जात आहे. त्याचप्रमाणे पॉझिटिव्ह येणारे व निगेटिव्ह येणारे अशा सर्वांवर नियमानुसार गुन्हे दाखल केले जात आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिली.
हेही वाचा - गूड न्यूज! यंदा सामान्य मान्सूनचा हवामान विभागाचा अंदाज!