जळगाव - जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील कोरोना संशयित रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांकडे एकही पीपीई किट नसल्याचे समोर आले हाेते. त्यानंतर शहरातील तरुण वकिल अॅड. राहुल राठी यांनी ५० पीपीई किट उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे जिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा... 'मास्कचा वापर छत्रीसारखा करू नका'
जळगावात दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर काेराेना संशयितांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करणाऱ्या डाॅक्टर्स आणि कर्मचारी वर्गाकडे पीपीई किट नसल्याचे समोर आले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे उपलब्ध असलेले १० पीपीई किट संपल्याने कर्मचारी एचआयव्ही किटचा वापर करुन उपचार करत होते. ही बाब आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील साधन सामुग्रीच्या तुटवड्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान शहरातील अॅड. राहुल लाठी यांनी देशभरात १५०० पीपीई कीट वाटप करणारे मुंबईतील फिल्म मेकर मनीष मुंदडा यांना जळगाव जिल्हा रुग्णालयातील पीपीई किटच्या तुटवड्याचे वृत्त ट्विट केले. त्यांच्याशी स्वत: संपर्कात साधून जळगावसाठी २० किटची मागणी लाठी यांनी केली. त्यास प्रतिसाद देऊन मुंदडा यांनी त्यांच्यातर्फे २० ऐवजी ५० पीपीई किट अॅड. राहुल लाठी यांच्याकडे पाठवले. या किटचा बॉक्स लाठी यांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.