जळगाव - शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा पुन्हा ४३ ते ४४ अंशांवर गेला आहे. सकाळी १० वाजेपासूनच तापमानाचा पारा चाळीशी गाठत असल्याने जीवाची काहिली होत आहे. उष्णतेमुळे रात्री ८ वाजेपर्यंत उकाडा जाणवत असून वाढत्या तापमानाने जनजीवनावर परिणाम आहे. जळगावात बुधवारी ४४ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले.
वातावरणातील बदलांमुळे राज्यातील किमान आणि कमाल तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, या आठवड्यात राज्यात उन्हाचा पारा ४२ अंशांच्या पुढे जाईल, असे सांगण्यात आले होते. यानुसार जळगाव शहरासह जिल्ह्यात गेल्या आठवड्यात घसरलेल्या तापमानात आता पुन्हा वाढ झाली आहे. मंगळवारी तर तापमानाच्या पाऱ्याने ४४ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला होता. सकाळपासूनच वातावरण तापायला सुरुवात होत आहे. दुपारी १२ वाजल्यानंतर उन्हाचे चटके अधिकच जाणवत आहेत. वाढलेल्या उन्हामुळे दुपारी शहरातील रस्ते अक्षरश: ओस पडतात. महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त कोणीही घराबाहेर पडत नाही.
सोमवारी व मंगळवारी जळगाव शहराच्या कमाल तापमानात वाढ होऊन ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवस तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सियसच्या पुढेच राहणार असून, किमान तापमानातही वाढ होईल, असे संकेत देण्यात आले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार २४ मेपर्यंत पारा वाढलेलाच असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सकाळी लवकर कामे आटोपावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.