जळगाव - लाचखोरीच्या गुन्ह्यात १० दिवसांची रिमांड व मालमत्तेची चौकशी न करण्याच्या मोबदल्यात ३ लाखांची लाच मागणाऱ्या चौघांवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात शनिवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गुन्हा दाखल झालेल्या चौघांमध्ये २ पोलीस कर्मचारी हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचेच आहेत.
नागपूरला सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले भीमा नरके, जळगाव जिल्हा विशेष शाखेतील पोलीस नाईक विजय जाधव तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस नाईक अरुण पाटील व श्यामकांत पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
या प्रकरणातील तक्रारदाराविरुद्ध जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेची मागणी करून लाच स्वीकारल्याने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात तक्रारदाराची १० दिवस पोलीस कस्टडी रिमांड तसेच मालमत्तेची चौकशी न करण्याच्या मोबदल्यात संशयित आरोपी भीमा नरके, विजय जाधव, अरुण पाटील व श्यामकांत पाटील या चौघांनी तक्रारदाराकडून ३ लाखांची लाच मागून ती मिळवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी चौघांविरुद्ध शनिवारी मध्यरात्री चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक जी.एम. ठाकूर करत आहेत.