जळगाव- जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात तापी नदीवर असलेल्या हतनूर धरणाचे 32 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळच्या सुमारास हे दरवाजे उघडण्यात आले असून, सद्यस्थितीत धरणातून 30 हजार 516 क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून तापी नदीच्या उगम क्षेत्रात म्हणजेच, मध्यप्रदेशात पाऊस पडत असल्याने तापी नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आले असून पाणी पातळीत वाढ झाली आहे. इकडे हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील पाऊस होत असल्याने खबरदारी म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी धरणाचे 32 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. धरणातून 30 हजार 516 क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरू आहे.
हतनूर धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ असल्याने त्यात पाण्याचा जास्त साठा करता येत नाही. म्हणून तापीच्या उगमस्थानी तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाला की, लागलीच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला जातो. यावर्षी पहिल्यांदाच हतनूर धरणाचे दरवाजे एवढ्या मोठ्या संख्येने उघडण्यात आले असून, त्यातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात हतनूरचे अवघे 4 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले होते. मात्र, पाऊस थांबल्याने पुन्हा उघडलेले दरवाजे बंद करण्यात आले होते. दरम्यान, हतनूर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने तापी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.