जळगाव - राज्य शासनाने १५ जुलैपासून राज्यात इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतच्या माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ३०६ माध्यमिक शाळांची घंटा आज (गुरुवार) पासून वाजणार आहे. कोरोनानंतर सुमारे दीड वर्षांनी शाळांचे प्रांगण हे विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुलणार आहे. ज्या गावात कोरोनाचा एकही रुग्ण नाही, अशा गावातील शाळा सुरू होत आहेत.
३०६ शाळांचेच आले ग्रामपंचायतींकडून ठराव -
शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाने ८ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा उघडण्याबाबत नियमावली जारी केली आहे. त्यात संबंधित गावांमधील ग्रामपंचायतींनी शाळा सुरू करण्यासाठी ठराव करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ७०८ माध्यमिक शाळा असलेल्या गावांपैकी ३०६ शाळांबाबत संबंधित ग्रामपंचायतींनी ठराव पाठवले. त्यामुळे निम्म्या शाळा उघडणार आहेत. उर्वरित शाळा बंदच राहणार आहेत, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिली.
ठराव नसलेल्या शाळांबाबत संभ्रम -
शाळा सुरू करण्यासाठी माध्यमिक शाळांना ग्रामपंचायतींचा ठराव मिळविणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ७०८ शाळा सुरू करण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन होते. परंतु, केवळ ३०६ शाळांचे ठराव संबंधित ग्रामपंचायतींनी दिले. त्यामुळे ठराव नसलेल्या शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम आहे. या शाळा उघडतील की नाही, याबाबत विद्यार्थी व पालक वर्ग संभ्रमावस्थेत आहे.
अशी आहे नियमावली -
शाळा सुरू करताना संबंधित गावांमध्ये गेल्या महिन्याभरात कोरोनाचा एकही रुग्ण नसावा, तसेच गावात स्थापन करण्यात आलेल्या समितीने ग्रामपंचायतीचा ठराव करून शाळेमार्फत शिक्षण विभागाला देणे आवश्यक आहे. शाळा सुरू करताना कोरोनाच्या नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे. १४ जुलैपर्यंत शिक्षण विभागाकडे ३०६ शाळा सुरू करण्याबाबत त्या-त्या गावांनी ठराव करून पाठविले आहेत. त्यामुळे येथे शाळा सुरू होणार आहेत अशी माहिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा - School Reopen : कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग गुरुवारपासून होणार सुरू