जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरूच आहे. जिल्ह्यात शनिवारी पुन्हा 285 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर 9 जणांचे बळी गेले. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 11 हजार 388 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, शनिवारी 284 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले.
जळगाव जिल्हा प्रशासनाला शनिवारी रात्री प्राप्त झालेल्या तपासणी अहवालांमध्ये एकूण 285 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले. त्यात सर्वाधिक 75 पॉझिटिव्ह रुग्ण हे जिल्ह्यातील प्रमुख हॉटस्पॉट असलेल्या जळगाव शहरात आढळले आहेत. त्याचप्रमाणे, जळगाव ग्रामीण 18, भुसावळ 12, अमळनेर 16, चोपडा 20, पाचोरा 23, भडगाव 11, धरणगाव 25, यावल 1, जामनेर 35, रावेर 9, पारोळा 6, चाळीसगाव 27, मुक्ताईनगर 6 आणि दुसऱ्या जिल्ह्यातील 1 असे एकूण 285 रुग्ण आढळले आहेत.
जिल्ह्यात शनिवारी 9 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 527 इतकी झाली आहे. शनिवारी मृत्यू झालेल्यांमध्ये जळगाव शहरातील 4, अमळनेर तालुक्यातील 2 तसेच एरंडोल, जळगाव आणि यावल तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 3 हजार 20 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 7 हजार 841 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.