जळगाव - जिल्ह्यातील सुमारे २१ हजार शेतकरी पंतप्रधान कृषी सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पंतप्रधान कृषी सन्मान योजने अंतर्गत संयुक्त खाते, अपूर्ण खाते क्रमांक, चुकीचा खाते क्रमांक आदी चुका असल्याने शेतकऱ्यांना या महत्त्वाकांक्षी योजनेच्या लाभापासून थांबविण्यात आले आहे.
हेही वाचा... बांग्लादेशात अल्पसंख्य सुरक्षितच, परराष्ट्र मंत्री मोमेन यांनी भारताचा दावा फेटाळला
शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे चौथ्या टप्प्यापासून लाभ देताना पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे पीएम-किसान पोर्टलवरील नाव व आधार कार्डवरील नाव एकसारखे असणे अनिवार्य आहे. जळगाव जिल्ह्यातील नोंदणी झालेल्या ३ लाख ९४ हजार ४६६ लाभार्थ्यांपैकी १ लाख ३१ हजार ८३४ लाभार्थ्यांचे नाव आधारकार्डप्रमाणे पीएम-किसान पोर्टलवर आढळून आले नव्हते. या कामासाठी तलाठी यांच्याकडे ज्या नावाची दुरुस्ती करावयाची आहे, अशी यादी पुरवण्यात आली होती. लाभार्थ्यांनी त्यांच्या नावाची दुरुस्ती तलाठी यांच्यामार्फत करून घेतली. पोर्टलवरील नाव आधारकार्डप्रमाणे अद्ययावत करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार लाभार्थ्यांचे नाव आधारकार्डप्रमाणे पीएम-किसान पोर्टलवर शेतकऱ्यांनी नोंदवले आहे.
हेही वाचा... नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचे पडसाद, ईशान्येकडील राज्यात आंदोलन
नाव अपडेट करण्याबाबतची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मात्र, या योजनेसाठी पात्र असलेल्या २१ हजारांवर शेतकऱ्यांचे संयुक्त खाते, अपूर्ण व चुकीचा खाते क्रमांक असल्याचे आढळून आले. ही दुरुस्ती केल्यानंतरच या शेतकऱ्यांना पीएम-किसान योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
हेही वाचा... B'Day Special : बारामतीकारांनी अनुभवलेले शरद पवार...
पंतप्रधान कृषी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यात ३ लाख ९४ हजार शेतकरी वार्षिक ६ हजार रुपये मिळण्यास पात्र ठरलेले आहेत. त्यापैकी २ लाख ७५ हजार ८१२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २ हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात आला. २ लाख ६५ हजार ४७७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दुसरा हप्ता जमा करण्यात आला. ५५ हजार ७८६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तिसरा हप्ता आतापर्यंत जमा करण्यात आलेला आहे.