जळगाव - उद्यानात खेळत असताना कारंज्यातील विजेच्या धक्क्याने दोघा भावंडांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास भुसावळ शहरातील जामनेर रस्त्यावरील पेट्रोल पंपावर घडली. दीपक शंकर राखुंडे (वय 12) आणि गणेश शंकर राखुंडे (वय 10) अशी मृत भावंडांची नावे आहेत. दोघेही मूळचे धुळे येथील रहिवासी आहेत. ते भुसावळात आपल्या मामाकडे आलेले होते.
भुसावळ शहरातील जामनेर रस्त्यावर एका पेट्रोल पंपावर छोटे उद्यान आहे. याठिकाणी दररोज सायंकाळी ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुले येत असतात. शनिवारी सायंकाळी दीपक आणि गणेश हे देखील या उद्यानात खेळण्यासाठी आलेले होते. ते खेळत असताना कारंज्यातील पाण्यात विजेचा प्रवाह उतरलेला होता. खेळता खेळता एकाला विजेचा धक्का बसल्याने तो कारंज्याच्या पाण्याच्या कुंड्यात पडला. त्याला बाहेर काढण्यासाठी गेलेला दुसरा भाऊ देखील आतमध्ये पडला. त्यात दोघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना समोर आल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत तत्काळ विजेचा प्रवाह बंद केला. त्यानंतर दोघांना कुंड्यातून बाहेत काढत खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
हेही वाचा - उन्नाव बलात्कार प्रकरण : मुख्यमंत्री योगींच्या भेटीनंतरच अंत्यसंस्कार, पीडितेच्या कुटुंबीयांची भूमिका
सुदैवाने एक मुलगी वाचली -
या घटनेत सुदैवाने आरती नामक एक 10 वर्षांची मुलगी वाचली आहे. ती देखील दोघांसोबत उद्यानात खेळत होती. दरम्यान, या घटनेनंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
हेही वाचा - कांद्याच्या भाववाढीने पर्यटकांच्या संख्येत घट; गोव्याच्या मंत्र्यांचा दावा